Coronavirus: ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना केंद्रीय सचिवांच्या कानपिचक्या; मृत्यूदर कमी करा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 02:56 AM2020-06-28T02:56:37+5:302020-06-28T02:56:48+5:30

मृत्यूदर कमी कसा करता येईल त्यासाठी काय काय प्रयत्न करणे गरजेचे आहे, याचा विचार करा, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लवकुमार अग्रवाल यांनी सांगितले.

Coronavirus: Union Secretary's earplugs to Thane District Municipal Corporation; Reduce mortality | Coronavirus: ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना केंद्रीय सचिवांच्या कानपिचक्या; मृत्यूदर कमी करा

Coronavirus: ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना केंद्रीय सचिवांच्या कानपिचक्या; मृत्यूदर कमी करा

Next

ठाणे : कोरोना रुग्णांची संख्या वाढते यामुळे घाबरू जाऊ नका, मृत्यूदर कसा कमी करता येईल यासाठी प्रयत्न करा तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करा, कंटेनमेंट झोनची प्रभावीपणे अंमलबाजवणी करा, कोरोना रुग्णांसाठी उभारलेल्या आरोग्य सेवेच्या ठिकाणी आवश्यक तो स्टाफ पुरवा, औषधोपचार वेळेत मिळावा यासाठी प्रयत्न करा, याशिवाय रोजच्या स्क्रीनिंगचे प्रमाण वाढवा अशा कानपिचक्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लवकुमार अग्रवाल यांनी ठाणे जिल्ह्यांतील महापालिकांना पाहणीनंतर झालेल्या बैठकीत दिल्या.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी अग्रवाल यांच्या अधिपत्याखालील पथकाने ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून त्याची कशा पद्धतीने अंमलबजावणी होते, याची माहिती घेतली. या वेळी त्यांच्यासोबत गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव आणि स्मार्ट सिटी मिशन डायरेक्टर कुणाल कुमार, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, केंद्रीय संचालक (आरोग्य) डॉ. ई. रवींद्रन आदीं उपस्थित होते.

वयोवृद्धांबरोबर ज्यांना कोरोनाची अधिकची लक्षणे दिसत असतील त्यांना आधी रुग्णालयात बेड उपलब्ध करून द्या, रोजची जी स्क्रीनिंग केली जाते, त्याची संख्या वाढवा, तपासणीची संख्या वाढवा, असेही त्यांनी सांगितले. मृत्यूदर कमी कसा करता येईल त्यासाठी काय काय प्रयत्न करणे गरजेचे आहे, याचा विचार करा, असे सांगितले.

कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कडक करा
कोरोनाशी लढा देताना नागरिकांना विश्वासात घ्या, जनजागृती करा, कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कडक करा, असेही त्यांनी सांगितले. कंटेनमेंट झोनमधून बाहेर जाणे, बाहेरचा नागरिक आत येणे हे फार चुकीचे आहे. त्यामुळे या ठिकाणी नियमांची कठोर अंमलबजावणी करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचा जे काही आपण करीत आहोत, ते तुमच्यासाठी करीत आहोत, हे त्यांना समजावून सांगा, असेही त्यांनी सांगितले.

सर्व महापालिकांचा घेतला आढावा
पाहणी दौरा झाल्यानंतर केंद्रीय पथकाने महापालिका मुख्यालयामध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांचा आढावा घेतला. सुरुवातीस ठाणे महापालिकेचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय पथकाने ठाणे जिल्हा, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर आदी महापालिकांचाही आढावा घेतला. या वेळी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, मीरा-भार्इंदर महापालिकेचे आयुक्त डॉ. राठोड, उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त दयानिधी, ठाणे पोलीस सहआयुक्त डॉ. मेखला आदी उपस्थित होते.

लॅबसोबत समन्वय ठेवा
शहरातील लॅबसोबत प्रशासन किंवा आरोग्य यंत्रणेने समन्वय ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून रुग्णांची माहिती मिळून त्या रुग्णांना वेळेत उपचार मिळणे शक्य होईल यासाठी प्रयत्न करा. असेही त्यांनी सांगितले.

ठाणे-मुंब्य्रातील कोविड हॉस्पिटलची पाहणी
सुरुवातीस या केंद्रीय पथकाने मुंब्रा येथील अमृतनगर, इन्शानगर येथील प्रतिबंधित लोकांची पाहणी करून तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम येथे उभारलेल्या कोविड हॉस्पिटलला भेट देऊन डॉक्टरांकडून माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी बाळकूम साकेत येथील एक हजार बेडच्या ठाणे कोविड हॉस्पिटलची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

चाचण्या वाढविण्यावर भर द्या-प्रदीप व्यास
राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या वेळी क्वारंटाइन सुविधा वाढविणे, मोठ्या प्रमाणात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता राखणे, मोठ्या प्रमाणात चाचण्या वाढविणे यावर लक्ष देण्याची आवश्यकता बोलून दाखविली.

Web Title: Coronavirus: Union Secretary's earplugs to Thane District Municipal Corporation; Reduce mortality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.