Coronavirus Updates: वाढत्या रुग्णांमुळे बेड होऊ लागले कमी; ठाणे महापालिका हद्दीतील वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 12:21 AM2021-03-27T00:21:34+5:302021-03-27T00:22:07+5:30

अवघे १,२७४ बेड शिल्लक, या शिल्लक बेडमध्ये विलगीकरणाचे ८४, ऑक्सिजनचे २५७, आयसीयूचे ६१ आणि व्हेंटिलेटरचे २१ बेड शिल्लक असल्याची माहिती मनपाने दिली.

Coronavirus Updates: Fewer bed bugs due to increasing number of patients; Reality within Thane Municipal Corporation limits | Coronavirus Updates: वाढत्या रुग्णांमुळे बेड होऊ लागले कमी; ठाणे महापालिका हद्दीतील वास्तव

Coronavirus Updates: वाढत्या रुग्णांमुळे बेड होऊ लागले कमी; ठाणे महापालिका हद्दीतील वास्तव

Next

ठाणे : ठाणे मनपा हद्दीत काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या चार ते पाचपटीने वाढत आहे. त्यामुळे मनपा हद्दीतील कोविड सेंटरमधील बेडची संख्याही कमी होत आहे. मनपा हद्दीत सध्या सहा हजार १२७ रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून त्यातील बहुसंख्य रुग्ण हे घरी उपचार घेत असल्याने रुग्णालयातील एक हजार ३५० बेड फुल झाले आहेत. तर सध्या एक हजार २७४ बेड शिल्लक आहेत. त्यातील ६०० बेड हे भाईंदरपाडा येथील विलगीकरण कक्षातील आहेत, तर दुसरीकडे खासगी रुग्णालयांतील बेड मात्र फुल होऊ लागले आहेत.

रुग्ण वाढत असल्याने मनपाने ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. सध्या दररोज ७०० ते ८०० रुग्ण आढळत आहेत. सध्या प्रत्यक्षात सहा हजार १२७ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. यातील एक हजार ३५० रुग्ण हे शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. त्यामुळे दोन हजार ६०२ बेडपैकी एक हजार २७४ बेड आजही रिकामे असल्याचा दावा मनपाने केला आहे; परंतु दुसरीकडे शहरातील खासगी रुग्णालयांतील तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील बेडही आता रिकामे नसल्याची माहिती पुढे आली आहे. 

महापालिकेच्या ग्लोबल कोविड सेंटरमध्ये विलगीकरणाचे २२१, ऑक्सिजनचे १३, आयसीयूचे ७७ आणि व्हेंटिलेटरचे १०० बेड शिल्लक असल्याची माहिती पालिकेने दिली. दुसरीकडे १६ खासगी रुग्णालयांत एकूण ९१० बेड असून त्यातील ३४१ बेड सध्या शिल्लक आहेत. उर्वरित ५६९ बेड फुल झाले आहेत. त्यातही शहरातील काही नामांकित खासगी रुग्णालयात बेडही शिल्लक नाहीत. त्यामुळे येथे उपचारासाठी रुग्ण वेटिंगवर असल्याची माहितीही मनपा सूत्रांनी दिली. या शिल्लक बेडमध्ये विलगीकरणाचे ८४, ऑक्सिजनचे २५७, आयसीयूचे ६१ आणि व्हेंटिलेटरचे २१ बेड शिल्लक असल्याची माहिती मनपाने दिली.

...तर तीन ते चार दिवसांत बेड फुल 
कोरोनाबाधितांपैकी घरी उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण हे जास्त असल्याने रुग्णालयात सध्या काही प्रमाणात बेड शिल्लक असल्याचे दिसत आहे; परंतु रुग्णवाढीचा हा दर असाच राहिला तर तीन ते चार दिवसांत बेड फुल होतील, असे दिसत आहे.

विलगीकरण कक्षात ६०० बेड रिकामे 
ठामपाने भाईंदर पाडा येथे विलगीकरण केंद्र पुन्हा सुरू केले आहे. तेथे लक्षणे नसलेल्यांना ठेवले जात आहे. त्यानुसार येथील ६७५ पैकी ७५ बेड फुल झाले असून ६०० बेड शिल्लक असल्याची माहिती मनपाने दिली.

Web Title: Coronavirus Updates: Fewer bed bugs due to increasing number of patients; Reality within Thane Municipal Corporation limits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.