coronavirus: लॉकडाऊनमुळे गावी रंगला विवाह सोहळा, कुटुंबीयांनी व्हिडिओ कॉलिंगवरून दिले आशीर्वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 10:07 PM2020-06-14T22:07:33+5:302020-06-14T22:09:22+5:30
लॉकडाऊनमुळे सोलापूर येथे रविवारी संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यात उपस्थित राहू न शकलेल्या ठाण्यातील कुटुंबाने व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून त्यांच्यावर अक्षता टाकल्या.
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे - लॉकडाऊनमुळे सोलापूर येथे रविवारी संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यात उपस्थित राहू न शकलेल्या ठाण्यातील कुटुंबाने व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून त्यांच्यावर अक्षता टाकल्या. तसेच नवविवाहित जोडप्यांना त्यांनी शुभाशीर्वाद ही दिले. विशेष म्हणजे हे कुटुंब मास्क घालून आणि फिजिकल डिस्टनसिंग ठेवून स्वतःच्या घरात उभे होते आणि मोबाईलवरून संपूर्ण विवाह सोहळा पाहत होते.
ठाणे पूर्व येथील कोपरी कॉलनीतील पीडब्लूडी चाळीत राहणारे मनेश सूत्रावे यांचा सोलापूर येथील मावस भाऊ विशाल केकडे याचा साताऱ्याची श्रद्धा जवंजाळ हिच्यासोबत रविवारी दुपारी सोलापूर येथील त्यांच्या निवासस्थानी विवाह सोहळा योजिला होता. या आधी एप्रिल महिन्यात या दोघांचा विवाह ठरविण्यात आला होता. लग्नपत्रिका देखील छापायला गेल्या होत्या परंतु लॉकडाऊनमुळे पत्रिकासह विवाह सोहळा देखील त्यांना रद्द करावा लागला. त्यानंतर वधू - वराच्या कुटुंबांनी 14 जून ही तारीख ठरवली. डिजिटल पत्रिका तयार करून ती व्हाट्सएपच्या माध्यमातून मोजक्याच नातेवाईकांना पाठविण्यात आली. हा सोहळा त्यांनी कमी नातेवाईकांच्या उपस्थितीत करण्याचे ठरविले. विवाह सोहळ्यात उपस्थितांना मास्क वाटप करण्यात आले तसेच, त्यांना सॅनेटायझर देण्याची सोय ही केली.
लॉकडाऊनमुळे अनेकांना विवाह सोहळ्याला जाणे तिथे शक्य नव्हते. त्यात कोपरीतील सूत्रावे कुटुंब देखील लॉकडाऊनमुळे घरातच अडकले म्हणून या कुटुंबाने व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातूनच विवाह सोहळा पाहण्याचे ठरविले. सूत्रावे यांची मुले मात्र आपल्या लाडक्या काकाचे लग्न पाहण्यासाठी लग्नाचे कपडे घालून नटून थटून त्यांच्यावर अक्षता टाकायला उभी राहिली होती. मनेश सूत्रावे, यांची पत्नी, दोन मुले, भाऊ आणि त्याचा मुलगा असे मंगलाष्टके होइपर्यंत आपल्याच घरक्त उभे राहून वधू वरावर अक्षता टाकत होते. दोघांनी एकमेकांना हार घातल्यावर घरातूनच टाळ्या वाजविल्या असे मनेश यांनी लोकमतला सांगितले.