Coronavirus : मॉर्निंग वॉकला गेले अन् आरोपी होऊन परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 07:42 PM2020-04-09T19:42:13+5:302020-04-09T19:42:34+5:30
मॉर्निंग वॉकला गेले आणि आरोपी होऊन परतले अशी या बेजाबाबदार लोकांची गत झाली. कोरोनाचा वाढता संसर्ग व कोरोनामुळे गेलेल्या बळीने नागरिकांमध्ये धाकधूक वाढवली आहे.
मीरा रोड - अत्यावश्यक कारणांशिवाय घरातून बाहेर पडण्यास बंदी असूनही बेजबाबदारपणा दाखवत मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या १९ जणांविरुद्ध काशिमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मॉर्निंग वॉकला गेले आणि आरोपी होऊन परतले अशी या बेजाबाबदार लोकांची गत झाली.
कोरोनाचा वाढता संसर्ग व कोरोनामुळे गेलेल्या बळीने नागरिकांमध्ये धाकधूक वाढवली आहे.
बहुतांश लोक घरात राहून शासन - पालिकेच्या निर्देशांचे पालन करत असताना काही अतिउत्साही बेजबाबदार मात्र स्वत:चीच मनमानी करत बाहेर फिरत आहेत. यामुळे त्यांच्यासह त्यांचे कुटुंबीय व शेजारीसुद्धा कोरोनाग्रस्त होण्याची भीती वाढली आहे. त्यामुळे काशिमीरा पोलिसांनी अशा अतिउत्साही लोकांना वठणीवर आणण्यासाठी थेट गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरु केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आज गुरुवारी सकाळी हाटकेश, सिल्वर पार्क, काशिमीरा नाका आदी भागात सकाळी मॉर्निंग वॉकसाठी फिरणा-या १९ जणांना पकडून पोलीस ठाण्यात आणले. पोलीस ठाण्याच्या आवारात खाली बसवले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन पुन्हा दिसलात तर अटक करू, असा खरमरीत इशारा त्यांना दिला आहे.