Coronavirus : आम्हाला वेतन मिळेल याची शाश्वती काय? कामगारांना सतावतेय चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 01:43 AM2020-03-21T01:43:04+5:302020-03-21T01:43:41+5:30

आधीच मंदी त्यात ओढावलेली बंदी पाहता वेतनाची शाश्वती काय? अशी चिंता कामगारांना लागली आहे.

Coronavirus: What is the certainty that we will get Salary? Concerned workers are suffering | Coronavirus : आम्हाला वेतन मिळेल याची शाश्वती काय? कामगारांना सतावतेय चिंता

Coronavirus : आम्हाला वेतन मिळेल याची शाश्वती काय? कामगारांना सतावतेय चिंता

Next

कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता कल्याण-डोंबिवली शहरांतील अन्य दुकाने बंद झाली आहेत. ही बंदी अपरिहार्य असली तरी त्यामुळे दुकानमालकांचे मोठे नुकसान होणार आहे. आधीच मंदी त्यात ओढावलेली बंदी पाहता वेतनाची शाश्वती काय? अशी चिंता कामगारांना लागली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शुक्रवारपासून जीवनावश्यक वस्तू नसलेली दुकाने बंद केली आहेत. त्यापार्श्वभूमीवर जो कष्टकरी कामगार, कर्मचारीवर्ग आहे, त्यांना किमान वेतन देणे बंद करू नका, कारण त्यांचे हातावर पोट आहे. जगण्यासाठी आपल्याला घरात थांबण्याची वेळ आली आहे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले असले तरी दुकानमालक आणि कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ३१ मार्चपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. पुढे अजून किती दिवस ही बंदी राहील, याची खात्री आता देऊ शकत नाही.

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सरकारने घेतलेला निर्णय चांगला आहे. त्याला आमचा विरोध नाही; परंतु बंदीच्या कालावधीत होणाऱ्या नुकसानीचे काय? याची चिंता लागली आहे. महिन्यातील २० दिवस उलटून गेले आहेत. पुढील दहा दिवसांनी कामगारांना पगार द्यावा लागणार आहे. आधीच मंदीमुळे व्यावसायिकांचे कंबरडे मोडले असताना सध्याची लादलेली बंदी अधिकच आर्थिक नुकसान करणारी ठरणार आहे. व्यवसाय पूर्णपणे बंद राहणार असल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावर होणार आहे. यात कामगारांना वेतन द्यायचे तरी कसे? याकडेही दुकान आणि हॉटेलचालकांकडून लक्ष वेधले जात आहे, तर दुसरीकडे मालकाचाच व्यवसाय न झाल्याने त्याच्यावर ओढावलेले संकट पाहता आपले वेतन कसे मागायचे, असा प्रश्न कामगारांना पडला आहे.

३१ मार्चपर्यंत दुकाने बंद राहणार आहेत. यात दुकानमालकांचेही आर्थिक नुकसान होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी कामगारांना किमान वेतन देण्याचे मत व्यक्त केले असलेतरी संकटात सापडलेल्या दुकानमालकांकडून वेतनाची अपेक्षा कशी करणार? हीदेखील वस्तुस्थिती आहे.
- अजित सांगेकर, दुकान स्टाफ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने बंद केली हे आम्हाला मान्य आहे; परंतु होणारे आर्थिक नुकसान पाहता कामगारांना पुढे वेतन कसे द्यायचे हादेखील प्रश्न आहे. आमचेही पोट हातावर आहे. व्यवसाय चालला तरच आम्हाला लाभ होणार आहे. जर्मनी आणि चीनमध्येही कोरोनाच्या प्रादुर्भावावर तेथील दुकाने बंद करण्यात आली आहेत. यामुळे होणा-या भरपाईपोटी तेथील सरकाने काही रक्कम बाजूला काढून ठेवली आहे. त्याप्रमाणे आपल्या सरकारनेही मदत करावी ही अपेक्षा.
- वनजा कार्ले, खाद्यपदार्थ स्टॉलचालक

डोंबिवलीत बंदला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद, बहुतांश नागरिक होते घरात
डोंबिवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीने केलेल्या आदेशानुसार शुक्रवारी शहरातील पूर्व व पश्चिमेतील दुकाने व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. केवळ जीवनावश्यक वस्तू, औषधे, दूध डेअरी, किराणा माल यांची दुकाने सुरू होती. दुसरीकडे बहुतांश नागरिकांनाही रस्त्यावर न उतरताच घरात बसून प्रशासनाला सहकार्य केले.

सकाळच्या वेळेत रेल्वेस्थानक परिसर, बँकांमध्ये काहीशी गर्दी होती. परंतु, ११ नंतर शुकशुकाट होता. शहरातील विविध मंदिरे, धार्मिक स्थळेही दर्शनासाठी बंद होती. मंगल कार्यालये, बैठका-सभांची ठिकाणे तसेच रस्त्यांवरील चहा, पानटप-या सर्व बंद होत्या. नागरिक रस्त्यांवर आले तरी फारसे कुठे थांबले नाहीत. दुपारनंतर उन्हाचा तडाखा वाढल्याच्याही प्रभावामुळे गर्दी दिसून आली नाही.

डोंबिवली रेल्वेस्थानकातही खासगी कर्मचारी वगळता प्रवाशांची फारशी गर्दी नव्हती. मात्र, कल्याण स्थानकात लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे प्रवासी होते. त्यामुळे तेथे वर्दळ होती. डोंबिवलीत रिक्षा सुरू होत्या. परंतु, प्रवासी नसल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. त्यामुळे सकाळनंतर दुपारी विविध स्टॅण्डवर तुरळक रिक्षा होत्या. सायंकाळी ७ नंतर काही प्रमाणात वाहने रस्त्यावर दिसून आली. तसेच नागरिकही रस्त्यावर बाहेर पडले होते. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पूर्वेला फडके, मानपाडा, रामनगर तर पश्चिमेला दीनदयाळ, उमेशनगर, गुप्ते रोड आदी ठिकाणी नागरिकांची वर्दळ
दिसून आली.

विद्यार्थी, पालकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द केल्याने पालक व विद्यार्थ्यांवरील तणाव नाहीसा झाला. बहुतांश सोसायट्यांमध्ये सायंकाळनंतर गच्चीत, इमारतीच्या आवारात लहान मुलांच्या खेळण्याचे आवाज येत होते.

रिक्षा रविवारी बंद
रिक्षा-चालक-मालक युनियनने मात्र रविवारी रिक्षा बंद ठेवण्याचा निर्धार केला आहे. पश्चिमेत तसे बोर्डही लावले आहेत. नागरिकांमध्ये जागृती होण्याच्या दृष्टीने फलकांवर संदेश लिहिल्याची माहिती युनियनचे उपाध्यक्ष शेखर जोशी यांनी दिली. आधीच व्यवसायावर मंदीचे सावट आहे. रविवारी नागरिक नसतील तर खोळंबण्यापेक्षा रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

टिटवाळा बाजारपेठेत ‘कोरोना बंद’, व्यापारी संघटनेचा निर्णय
टिटवाळा : गर्दीमुळे कोरोनाची वेगाने लागण होण्याची शक्यता असल्यामुळे राज्य शासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर टिटवाळा येथील व्यापारी संघटनेने बाजारपेठ आणि रिक्षा संघटनेने रिक्षा वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत तो लागू राहणार आहे. त्यामुळे शुक्रवारी बाजारपेठेत कडकडीत बंदसदृश स्थिती होती.
कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी आवाहन करतानाच सर्व शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळे, जत्रा, आठवडा बाजार व इतर कार्यक्र म बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
टिटवाळा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष भोईर व रिक्षा युनियनचे अध्यक्ष बाळा भोईर यांनीही नागरिक व व्यापाºयांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षातून फक्त तीन प्रवाशांची वाहतूक करावी. जास्त प्रवासी वाहतूक केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन रिक्षा युनियनतर्फे करण्यात आले आहे. या आवाहनानंतर गणपती मंदिर ते टिटवाळा स्थानक या मुख्य रस्त्यावर रिक्षांची वाहतूक तुरळक सुरू होती. या बंदला येथील नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत कोरोनाला हरवण्याचा निश्चय केल्याचे दिसत होते.

म्हारळमध्येही बंद
म्हारळ : म्हारळ ग्रामपंचायतीने शुक्रवार ते रविवारदरम्यान जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार दुकानदारांनीही शुक्रवारपासून दुकाने बंद ठेवली. कल्याण-मुरबाड महामार्गावर तुरळक वाहतूक होत आहे. शहाड रेल्वेस्टेशन व मोहने रोडवर शुकशुकाट होता. नावारांग क्र ीडा मंडळाचे रमेश जाधव व सहकाºयांनी स्टेशन परिसरातील रिक्षांमध्ये जंतुनाशक फवारणी करून त्या निर्जंतूक केल्या. दरम्यान, म्हारळ येथे दुबई व जपानहून आलेल्या दोघा रहिवाशांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. डी. मोरे व डॉ. निखिल पाटील यांनी त्यांची आरोग्य तपासणी केली असता दोघांमध्ये आजाराची लक्षणे आढळली नाहीत; परंतु एकास उल्हासनगरच्या मध्यवर्ती रु ग्णालयात विलगीकरणासाठी पाठवले आहे.

Web Title: Coronavirus: What is the certainty that we will get Salary? Concerned workers are suffering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.