Coronavirus: संध्याकाळी ७ वाजण्यापूर्वी कोरोना विषाणू कुठे असतो?; महापालिकेचे अधिकारी निरुत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 12:47 AM2020-10-12T00:47:47+5:302020-10-12T06:56:16+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजीवन सुरळीत सुरू व्हावे, यासाठी सध्या राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची कार्यवाही सुरू आहे
कुमार बडदे
मुंब्रा : संध्याकाळी ७ वाजल्यानंतर उघड्या असलेल्या दुकानांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना संध्याकाळी ७ वाजण्यापूर्वी कोरोना कुठे असतो, तो ७ वा.नंतरच येतो का, असे प्रश्न विचारून एका महिलेने बुचकळ्यात टाकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, अधिकाºयांकडे या प्रश्नांची उत्तरे नसल्यामुळे त्यांना या महिलेसह उपस्थित असलेल्या जमावासमोर निरुत्तर व्हावे लागले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजीवन सुरळीत सुरू व्हावे, यासाठी सध्या राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची कार्यवाही सुरू आहे. याअंतर्गत दुकानचालकांना संध्याकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर, उघड्या असलेल्या दुकानांवर अधिकारी कारवाई करत आहेत. अशाच प्रकारे मुंब्य्रातील कौसा भागातील तन्वरनगर परिसरात सायंकाळी ७ वा.नंतर उघड्या असलेल्या दुकानांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक प्रभाग समितीमधील अधिकारी, कर्मचारी गेले होते. त्यावेळी ग्राहक म्हणून बाजारहाट करण्यासाठी तेथे गेलेल्या एका महिलेने पोलीस बंदोबस्तामध्ये असलेल्या अधिकाºयांना संतप्त होऊन वेळेबाबतचा प्रश्न विचारला. तिच्या प्रश्नाची री ओढत तेथे उपस्थित असलेल्या अन्य एका पुरुषाने तिच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची मागणी अधिकाºयांकडे केली.