CoronaVirus: संपूर्ण कळवाच लॉकडाऊन; विटाव्यात सापडला कोरोनाचा १०वा रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 09:21 PM2020-04-06T21:21:31+5:302020-04-06T21:55:53+5:30
कळव्यातील काही चाळी आणि इमारती देखील सील करण्यात आल्या आहेत.
ठाणे : कळव्यात कोरोनाचा १० वा रुग्ण सापडल्याने प्रशासनाची अक्षरशः झोप उडाली असून, यानंतर संपूर्ण कळवाचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. कळव्यात केवळ मेडिकल सुरू राहणार असून इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली असल्याने जीवनावश्यक वस्तूंसाठी महापालिकेच्या हेल्पलाईनवर कॉल करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तर कळव्यातील काही चाळी आणि इमारती देखील सील करण्यात आल्या आहेत.
कोरोनाचे केंद्रबिंदू आता कळवाच ठरले असून, कळव्यातील विटावा परिसरात कोरोनाचा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे ठाणे शहरात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही कळव्यात असून, ही संख्या आता १० वर जाऊन पोहोचली आहे. तर ठाणे शहरात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही २२ वर जाऊन पोहोचली आहे. सुरुवातीला पारसिक नगरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर हे प्रमाण इतके वाढेल याची कल्पना देखील प्रशासनाला नव्हती.
मात्र हा आकडा झपाट्याने वाढत असून आता संपूर्ण कळवाच लॉकडाऊन करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. कळव्यात ज्या-ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत त्या इमारती आणि परिसर देखील सील करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. यामध्ये मनीषा नगर, कळव्यातील एक खासगी हॉस्पिटल, मनीषा नगर मधील एक चाळ आणि इतर काही परिसर सील करण्यात आले असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
कळवा, मुंब्रा आणि दिव्यात आधीच सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तर कळवा आणि मुंब्रा परिसरात भाजी मार्केट देखील पूर्णपणे बंद करण्यात आले असून, पुढील आदेश मिळेपर्यंत हे भाजी मार्केट बंद राहणार आहे. त्यामुळे कोरोनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या कळव्यावर प्रशासनाचे विशेष लक्ष असणार आहे.