coronavirus: क्वारंटाईन 66 हजार जणांवर वाॅच कोणाचा? प्रशासनाचे दुर्लक्ष, काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 01:23 AM2020-12-08T01:23:33+5:302020-12-08T01:23:44+5:30
Thane coronavirus: ठाणे जिल्ह्यात तब्बल ६५ हजार ८४८ होम क्वारंटाइन रुग्ण असून, त्यांच्याकडे पूर्वीप्रमाणे गंभीरपणे लक्ष दिले जात नसल्याची बाब समोर आली आहे.
- अजित मांडके
ठाणे - दिवाळीनंतर कोरोना रुग्णांसोबतच होम क्वारंटाइन केलेल्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. जिल्ह्यात तब्बल ६५ हजार ८४८ होम क्वारंटाइन रुग्ण असून, त्यांच्याकडे पूर्वीप्रमाणे गंभीरपणे लक्ष दिले जात नसल्याची बाब समोर आली आहे. आरोग्य केंद्रातील नर्स एकदाच घरी जाऊन विचारपूस करीत असून, एकदा औषधे दिल्यानंतर त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे वास्तव आहे.
सुरुवातीच्या काळात लक्षणे नसलेल्या रुग्णांवर यंत्रणेचा करडा वाॅच असायचा. रुग्ण आढळल्यानंतर तो परिसर किंवा इमारत सील केली जात होती. आता तेवढे गांभीर्य दिसत नाही. रुग्ण पॉझिटिव्ह आला आणि लक्षणे नसली, तर रुग्ण घरच्या घरी औषधे घेत आहेत. पालिकेकडून फारसे लक्ष दिले जात नाही. रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आशा वर्कर घरी येऊन त्यांना औषधोपचार देत आहेत, परंतु रोज देखरेख ठेवली जात नाही.
होम क्वारंटाईन रूग्णांचे काय?
कोरोना रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली, तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्यात होम क्वारंटाइन रुग्णांची संख्या ही ३४ लाख ३६ हजार १३४ एवढी होती. त्यानंतर, आजघडीला ६५ हजार ८४८ रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. पूर्वी ज्या पद्धतीने या रुग्णांवर देखरेख ठेवली जात होती, ती आता ठेवली जात नाही. पूर्वीसारखे काळजीपूर्वक आता लक्ष दिले जात नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
एखाद्या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर त्याला आधी कोणता त्रास होत आहे का, याची विचारपूस केली जाते. त्याला त्रास नसेल, तर घरीच राहण्याचा सल्ला दिला जात असून, त्यालाच ऑक्सिजन लेव्हल तपासण्यास सांगितले जाते. त्यानंतर, त्याला औषधे दिली जात आहेत, परंतु त्यानंतर केवळ फोनवरून त्रास वाढला आहे का, याची विचारपूस केली जाते.
होम क्वारंटाइन रुग्णांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही त्या-त्या महापालिकांची असते. त्यानुसार, त्यांच्याकडून मेडिकल स्टाफ यासाठी दिला जात आहे. तसेच त्यांच्याकडूनच अशा रुग्णांवर देखरेख ठेवली जात आहे.
- कैलाश पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे जिल्हा रुग्णालय