CoronaVirus News: पॉझिटिव्ह पतीच्या उपचारासाठी महिलेची आठ दिवस वणवण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 12:51 AM2020-06-18T00:51:20+5:302020-06-18T00:52:04+5:30

डोंबिवलीतील घटना : अखेर खाजगी रुग्णालयात केले दाखल

CoronaVirus Woman did not get treatment for her corona positive husband | CoronaVirus News: पॉझिटिव्ह पतीच्या उपचारासाठी महिलेची आठ दिवस वणवण

CoronaVirus News: पॉझिटिव्ह पतीच्या उपचारासाठी महिलेची आठ दिवस वणवण

Next

कल्याण : डोंबिवली पूर्वेतील नांदिवली-पी अ‍ॅण्ड टी कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेच्या पतीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, त्यांना केडीएमसीकडून सहकार्य मिळत नसल्याने गरिबांनी उपचारासाठी जायचे कुठे, असा संतप्त सवाल तिने केला आहे. सध्या तिच्या पतीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आठ दिवसांपासून उपचारासाठी वणवण करावी लागत असल्याची व्यथा तिने मांडली आहे.

महिलेचे पती रिक्षाचालक आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत तिच्या पतीला आठ दिवसांपूर्वी त्रास जाणवू लागला. त्यांनी फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला असता त्यांनी कोरोनाची लक्षणे असल्याचे सूचित केले. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर या कुटुंबाने मनपा प्रशासनाकडे मदत मागत महिला व मुलाला क्वारंटाइन करण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही.
शास्त्रीनगर कोविड रुग्णालयात बेड कमी आहेत. तेथे उपचारासाठी दाखल केले, तरी योग्य काळजी घेतली जाईल की नाही, याची हमी देता येत नाही, असे त्यांना एका डॉक्टरनेच सांगितले. अखेरीस या महिलेच्या पतीने स्वत:च रिक्षा चालवून कल्याण पूर्वेतील मलंग रोडवरील एक खाजगी रुग्णालय गाठले. तेथे त्यांना दाखल करण्यात आले. आमदार गणपत गायकवाड त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी महिलेची व्यथा ऐकल्यावर केडीएमसी प्रशासनावर निशाणा साधला आहे. लक्षणे आढळल्यास त्या रुग्णाला तातडीने क्वारंटाइन केले पाहिजे. त्याची चाचणी करून उपचार सुरू केले पाहिजेत. मात्र, रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांना आठ दिवस वणवण करावी लागली. रुग्णांची वणवण थांबवली नाही, तर कोरोना वाढण्याची भीती आहे. या कारभाराला मनपा जबाबदार आहे, असे ते म्हणाले.

महिलेच्या पतीच्या चाचणीकरिता दोन हजार ७०० रुपये शुल्क घेतले गेले. वास्तविक पाहता सामान्यांसाठी चाचणी मोफत करायची आहे. समजा, शुल्क घेतलेच तर दोन हजार २०० रुपये घ्यायचे आहेत. पाचशे रुपये जादा कशाच्या आधारे घेतले. सामान्यांसाठी उपचारासाठी बेड उपलब्ध करून दिले जात नसतील, तर त्यांनी जायचे कुठे? आधीच लॉकडाऊनमुळे सामान्य माणूस कामधंदा नसल्याने कंगाल झाला आहे, अशी टीका त्यांनी केली.

महानगरपालिका करणार प्रकाराची शहानिशा
यासंदर्भात केडीएमसीच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता याविषयी शहानिशा केली जाईल. महापालिकेकडून तरी अशा प्रकारची रुग्णांची हेळसांड केली जात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: CoronaVirus Woman did not get treatment for her corona positive husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.