CoronaVirus News: कोविड रुग्णालयातील ६० टक्क्यांहून अधिक खाटा रिकाम्या असताना नव्या उपचार केंद्राचा घाट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 04:10 PM2020-08-28T16:10:19+5:302020-08-28T16:14:16+5:30

सत्ताधारी भाजपासह आमदार गीता जैन यांचा विरोध

CoronaVirus work of new center begins even after 60 per cent beds are vacant | CoronaVirus News: कोविड रुग्णालयातील ६० टक्क्यांहून अधिक खाटा रिकाम्या असताना नव्या उपचार केंद्राचा घाट

CoronaVirus News: कोविड रुग्णालयातील ६० टक्क्यांहून अधिक खाटा रिकाम्या असताना नव्या उपचार केंद्राचा घाट

Next

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेकडे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी बंदिस्त सभागृह व इमारती असताना तसेच सध्या असलेल्या कोरोना रुग्णावरील उपचारासाठीच्या २९६५ खाटांपैकी तब्बल १८४९ खाटा रिक्त असताना देखील सुमारे १२ कोटी खर्चून मैदानात उभारल्या जाणाऱ्या मंडपातील ७०० खाटांच्या कोरोना उपचार केंद्रा वरून उशिराने का होईना जाग येऊन सत्ताधारी भाजपासह अपक्ष आमदार गीता जैन यांनी या कोट्यवधींच्या वायफळ खर्चास विरोध दर्शवला आहे. यावरून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक विरुद्ध भाजपा आणि गीता जैन अशी जुंपली आहे . 

भाईंदर पूर्वेच्या बाळासाहेब ठाकरे मैदानात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सुरवातीला १ हजार खाटांचे रुग्णालय मंडप उभारून बांधणार असे सांगितले जात होते . पण आता केवळ ७०० खाटांचेच हे रुग्णालय असणार आहे . कोरोनाच्या सुरवातीच्या काळा पासून या ना त्या कारणाने काम सुरु झाले नाही . १२ जुलै रोजी जेव्हा या मंडपातील रुग्णालयास मंजुरी देण्यात आली तो पर्यंत शहरात कोरोना रुग्णावर उपचारासाठी महापालिकेची बंदिस्त सभागृह , एमएमआरडीए योजनेतील इमारती तसेच खाजगी विकासकांच्या इमारती, राधास्वामी सत्संग मधील मोठ्या शेड,  रुग्णालये असे अनेक पर्याय उपलब्ध झाले . 

तसे असताना देखील महापालिकेने ६ ऑगस्ट रोजी धारावी डेकोरेटर्स या ठेकेदारास तब्बल १० कोटी ३३ लाखांच्या अंदाजित खर्चाचे कंत्राट दिले . तर सदरचा खर्च हा १२ कोटींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे . २० दिवसात सदर ठेकेदाराने मंडप सह आतील सर्व व्यवस्था उभारून द्यायची होती . पण अजून काम पूर्ण झालेले नाही. विशेष म्हणजे मंडप आदी साहित्य हे केवळ ३ महिन्यांच्या भाडेतत्वावर असून त्या नंतर खर्चात आणखी मोठी वाढ होणार आहे . 

महापालिकेकडे पर्यायी सभागृह , इमारती व राधास्वामी सत्संग मधील मोकळ्या शेड उपलब्ध असताना तसेच रुग्णांच्या तुलनेत जास्तीच्या खाटा असूनही पालिकेने कंत्राट दिले . आ . प्रताप सरनाईक यांनी या मैदानातील रुग्णालयासाठी सतत मागणी करत आंदोलनाचा इशारा देखील दिला होता हे विशेष . या बाबत १८ जुलैच्या लोकमत हॅलो ठाणे मध्ये मैदानातील रुग्णालयावर १२ कोटींची उधळपट्टी असे सविस्तर वृत्त देखील प्रसिद्ध झाले होते . 

परंतु सुरवातीला मात्र ठेकेदारास कार्यादेश मिळाले व त्या नंतर काम सुरु होऊन ऑगस्ट संपायला आला तो पर्यंत या प्रकरणी उघड विरोध असा केलाच नाही . सभापती अशोक तिवारी यांनी मात्र पत्र देऊन १२ कोटींचा अनावश्यक खर्च करू नका असे आयुक्तांना कळवले होते. आता मैदानात मंडप उभारून झाल्यावर तक्रारी व उघड विरोध सुरु झाला आहे . 

खुद्द महापौर ज्योत्स्ना हसनाळे, भाजपाचे नगरसेवक ऍड रवी व्यास, सुरेश खंडेलवाल आदी नगरसेवकांनी या १२ कोटींच्या मैदानातील रुग्णालयावर खर्च वायफळ असल्याचे सांगून त्या ऐवजी पालिकेच्या इंदिरा गांधी वा जोशी रुग्णालयात रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळावेत यासाठी खर्च करा अशी मागणी केली आहे . 

अपक्ष आमदार गीता जैन यांनी सांगितले की, सध्याची कोरोना रुग्णांची संख्या व उपलब्ध असलेल्या खाटा पाहता या मैदानातील रुग्णालयावरचा खर्च टाळल्यास बरे होईल . सदरचे १२ कोटी शहरातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्यावर खर्च केल्यास त्याचा सदुपयोग होईल . 

मैदानातील रुग्णालय उभारणीस होणारा भाजपा सह अपक्ष आमदार गीता जैन यांच्या विरोध मुळे आ. सरनाईक मात्र चांगलेच संतापले आहेत. भाजपाने पालिकेत सत्ता असताना केवळ भ्रष्टाचार आणि टेंडर टक्केवारी साठीच काम केले असून नागरिकांच्या आरोग्याची काळजीच घेतली नाही. गीता जैन शिवसेनेच्या बळावर निवडून आल्या. मुख्यमंत्री ऑनलाईन उदघाटनाला होते तेव्हा होत्या.  शिवसेनेचे पालकमंत्री , खासदार यांच्या माध्यमातून कामे करून घेतात आणि आता कोविड रुग्णालयाला विरोध करतात असे सरनाईक म्हणाले. 

सध्या असलेल्या २९६५ खाटां पैकी तब्बल १८४९ खाटा रिक्त
महापालिकेच्या २७ ऑगस्ट रोजीच्या आकडेवारी नुसार सध्या शहरातील ३ कोविड केअर मध्ये १८१६ रुग्णांची क्षमता आहे . परंतु सध्या १२४० खाटा शिल्लक आहेत . तर १४ रुग्णालयां मध्ये ५५८ खाटा कोरोना रुग्णां साठी असून त्यातील १८१ खाटा ह्या रिकाम्या आहेत .  ७ कोविड उपचार केंद्रात ५९१ खाटा असून त्यातील तब्बल ४२८ खाटा ह्या रिक्त आहेत . त्यामुळे सध्या असलेल्या २९६५ खाटां पैकी तब्बल १८४९ खाटा ह्या रिक्त असताना आणखी ठाकरे मैदानातील ७०० खाटांच्या रुग्णालया साठी तब्बल १२ कोटींचा खर्च करणे कोणत्या दृष्टीने या आर्थिक संकटात व्यवहार्य ठरेल असा प्रश्न उपस्थित होत आहे . शिवाय गरज भासल्यास आता कोरेन्टाइन इमारत , अन्य सभागृह , खाजगी विकासकांनी देऊ केलेल्या इमारती तसेच राधास्वामी सत्संग मधील भल्या मोठ्या शेड चे पर्याय उपलब्ध आहेत.

Web Title: CoronaVirus work of new center begins even after 60 per cent beds are vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.