CoronaVirus : लस विकसित करण्याचे जगभर प्रयत्न; किमान वर्ष लागण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 01:07 AM2020-04-26T01:07:09+5:302020-04-26T01:07:25+5:30
मुळात ही लस कोरोनाला पूर्णपणे आळा घालण्यात किती उपयुक्त ठरेल, हे आताच सांगता येणार नाही, असे आरोग्यविश्लेषक डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितले.
स्नेहा पावसकर
ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन सुरू आहे. कोरोनाला हरवायचं असेल तर लस शोधली पाहिजे, असे अनेक जण म्हणतात. यादृष्टीने सध्या जगभरात कोरोनावर प्रतिबंधात्मक लस शोधण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठी कमीत कमी वर्षभराचा कालावधी लागेल, शिवाय ती महागही असेल. मुळात ही लस कोरोनाला पूर्णपणे आळा घालण्यात किती उपयुक्त ठरेल, हे आताच सांगता येणार नाही, असे आरोग्यविश्लेषक डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितले.
कोरोनावर प्रतिबंधात्मक लस शोधण्याचे जगभरात कुठे आणि काय प्रयत्न सुरू आहेत ?
कोरोनावर प्रतिबंधात्मक लस शोधण्याचे जगभरात सध्या चीन, अमेरिका, साऊथ कोरिआ, जर्मनी आणि ब्रिटन या देशात प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न सध्या प्राथमिक स्तरावर आहेत. लस बनवताना प्रयोगाच्या काही स्टेजेस् असतात. लस बनवणे ही वेळखाऊ प्रक्रिया असते. ब्रिटनमध्ये एक वॅक्सिन तयार केलं असून २३ एप्रिलपासून त्याचे १८ ते ५५ वयोगटातील ५१० स्वयंसेवकांवर प्रयोग सुरू केले आहे. आॅक्सफर्ड विद्यापीठातही सारा गिलबर्ट आणि सहकारी प्रयोग करत आहेत.
भारतात लस शोधण्याबाबत काय परिस्थिती आहे? आणि एकूणच त्यासमोर कोणती आवाहने आहेत?
जगभरात ही लस शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यादृष्टीने भारतात असे कुठेही भरीव प्रयोग झालेले नाहीत. मुळात यासाठी खूप आर्थिक निधी लागतो. आपल्या देशात बौद्धिक क्षमता असलेले डॉक्टर्स, संशोधक आहेत, परंतु त्यासाठी लागणारा निधी खर्च करण्याची सरकारची मानसिक तयारी हवी. मुळात आपल्या देशात खाजगी क्षेत्रांतील संस्थांकडे लस विकसित करण्याची यंत्रणा आहे. पण त्यासाठी शासन आणि खाजगी संस्थांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. परंतु ही लस तयार झाली तरी सध्याच्या प्रतिबंधात्मक उपायांना ती पर्याय ठरेल असे वाटत नाही. धो-धो पावसात समुद्रकिनारी छत्री घेऊन उभं राहिल्यावर छत्री जितकं संरक्षण करेल तितकंच ही लस करू शकेल, असं सध्या तरी वाटतं.
>एकच लस सर्व देशांतील रूग्णांसाठी उपायकारक ठरेल?
वेगवेगळ्या देशातील भौगोलिक स्थिती, वातावरण, तेथील लोकांची रोगप्रतिकारशक्ती ही वेगळी असते. आणि व्हायरस हा आपले रूप बदलून संक्रमित (म्यूटेट) होत असतो. त्यामुळे या व्हायरसची जितकी स्ट्रेन्थ भारतात असेल तितकीच दुसऱ्या देशात असेल असे सांगता येत नाही. परिणामी साधारण वर्षभरानंतर परदेशात तयार होणारी लस व्हायरसच्या तेव्हाच्या भारतातील स्ट्रेन्थशी मिळतीजुळती किंवा त्यावर परिणाम करणारी असेलच, असे सांगता येत नाही. मुळात फ्लूच्या लशी या दक्षिण आणि उत्तर ध्रुवावरील लोकांसाठी दोन वेगळ्या आहेत. त्याचीही माहिती अनेक डॉक्टर्सना नाही. पण जर कोरोनाची लस बनवली, तर वेगळ्या ध्रुवावरील लोकांसाठी दोन बनवाव्या लागतील.
जगभरातील गरीब देशांना ही लस परवडेल?
लस नक्कीच महाग असेल. कोरोनामुळे आर्थिक स्थिती बिघडलेल्या भारताला तो खर्च कसा परवडेल, हा प्रश्नच आहे. लस प्राधान्य क्रमाने वापरावी लागेल.