Coronavirus : कोरोनामुळे योगवर्ग बंद नको -योगशिक्षकांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 01:13 AM2020-03-18T01:13:57+5:302020-03-18T01:14:35+5:30
कोरोनाचे सावट आल्याने खबरदारी म्हणून बहुतांश योगवर्गही बंद ठेवले आहेत
ठाणे : कोरोनाचे सावट आल्याने खबरदारी म्हणून सरकारने समूहाने एकत्र येण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश योगवर्गही बंद ठेवले आहेत; परंतु योगमुळे रोगप्रतिकारक क्षमता विकसित होते, श्वसनक्षमता वाढते, त्यामुळे योगवर्ग सुरू ठेवावेत. योगवर्गात पाच ते दहा जणांची संख्या असावी, अशी मागणी योगशिक्षकांनी केली आहे. सरकारने सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याचे तसेच, शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस, व्यायामशाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ठाण्यात अनेक योगवर्ग बंद ठेवले आहेत; परंतु योगचे शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत. कोरोनाच्या भीतीपासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी योगवर्ग सुरू ठेवण्याची गरज आहे. शासनाने समूहाने एकत्र येण्यावर बंदी घातली असल्याने ते नाइलाजाने बंद ठेवावे लागत असल्याची खंत योगशिक्षकांनी व्यक्त केली.
रोज पाच जणांना घेऊन योग शिकवायला हरकत नाही. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता प्राणायम करणे तरी आवश्यक आहे.
- ज्योत्स्ना प्रधान
योगवर्गात परदेशातून आलेला कोणीही नसतो. ज्याला ही बाधा झाली आहे त्याच्याकडून संसर्ग होण्याची भीती असते. प्राणायम केले तरी शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे योगवर्ग सुरू असावेत.
- स्मिता निमकर
सरकारने आदेश दिल्याने योगवर्ग बंद ठेवले आहेत. योग करताना कोणताही संसर्ग होत नाही. आमच्याकडे दारे, खिडक्या उघडी असतात. योगसाधनेने उत्साह होतो, तब्येत चांगली राहते. त्यामुळे एका वर्गात पाच ते दहा जणांना परवानगी मिळावी.
- नीलिमा येवलेकर