coronavirus: तरुणाईच्या दिवाळी पहाटला लागणार ब्रेक? कोरोनामुळे सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 01:46 AM2020-10-28T01:46:06+5:302020-10-28T01:46:38+5:30
Diwali Pahat : अलीकडे तरुणाईच्या दिवाळी पहाटला ग्लॅमर प्राप्त झाले असल्याने या ठिकाणी तरुणांची प्रचंड गर्दी असते. मात्र यंदा सण, उत्सवांवर कोरोनाचे सावट आहे.
ठाणे : दरवर्षी राम मारुती रोड येथे तरुण मुले एकत्र येऊन दिवाळी पहाट साजरी करतात. अलीकडे तरुणाईच्या दिवाळी पहाटला ग्लॅमर प्राप्त झाले असल्याने या ठिकाणी तरुणांची प्रचंड गर्दी असते. मात्र यंदा सण, उत्सवांवर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी काही तरुणांनी या दिवाळी पहाटला उपस्थिती लावण्यास नकार दिला आहे. काही जणांनी मात्र वर्षभराची मरगळ झटकण्यासाठी या दिवाळी पहाटला मित्रांना भेटणार असल्याचे सांगितले. तरुणाईच्या दिवाळी पहाटला ठाणे महापालिकेने हरकत घेतली नसली तरी तरुणांना सुरक्षिततेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पालिका आणि पोलीस मिळून या दिवशी विशेष मोहीम राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी राम मारुती रोड, गडकरी रंगायतन, तलावपाळी या परिसरात जमून आपल्या मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देण्याची परंपरा ठाणेकर कायम राखत आले आहेत. एकीकडे नाट्यगृह, कट्टे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची सुरमयी दिवाळी पहाट होत असते, तर दुसरीकडे या ठिकाणी तरुणाईची दिवाळी पहाट साजरी होत असते. अलीकडे या ठिकाणी विविध कार्यक्रम होत असून, त्यात राजकीय व्यक्तीही सहभागी होत असल्याने अलोट गर्दी होत असते. यंदा सण-उत्सवांवर कोरोनाचे संकट कायम राहिले आहे. अनलॉक सुरू केले असले तरी, सुरक्षिततेचे नियम पाळण्याच्या सूचना प्रशासन स्तरावर केल्या जात आहेत. त्यामुळे कोरोनाकाळात तरुणाईची दिवाळी पहाट होणार का, याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे. तसेच, दिवाळी पहाट आणि कोरोना याबाबत मीम्सही फिरत आहेत.
त्यामुळे दरवर्षीप्रमाणे या दिवाळी पहाटला गर्दी होणार नसल्याचे चित्र आहे. बहुतांश तरुणांनी राम मारुती रोड येथे जाणार नसल्याचे, तर काहींनी यंदा घरातच दिवाळी साजरी करण्याचे सांगितले. काहींनी मात्र मित्र-मैत्रिणींना भेटण्यासाठी दिवाळी पहाटचे निमित्त साधणार असल्याचे सांगितले. राम मारुती रोडवर तरुणांनी जमण्यास आम्ही अडविणार नाही, परंतु त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क घालणे आणि गर्दी होऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
पालिका आणि पोलिसांच्या समन्वयाने विशेष मोहीम
ठाणे : तरुणांना दिवाळी पहाटला जमता येईल, पण गर्दी करता येणार नाही. त्यांनी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. या दिवशी पालिका आणि पोलीस प्रशासन एकमेकांमध्ये समन्वय साधून विशेष मोहीम राबवतील. उत्सवाला गालबोट लागणार नाही, याची पालिका काळजी घेईलच. परंतु तरुणांनीही पालिकेला सहकार्य करणे अपेक्षित आहे, असे मत ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी व्यक्त केले. दिवाळी पहाटबाबत पालिकेची भूमिका माळवी यांनी स्पष्ट केली. सध्या शासनाकडून सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिलेली नाही. त्यामुळे नाट्यगृहांत किंवा कट्ट्यांवर होणाऱ्या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना सध्या तरी परवानगी नसल्याचे माळवी यांनी या वेळी सांगितले.
राम मारुती रोडला दिवाळी पहाटला गर्दी होत असते त्यामुळे यंदा घरातच दिवाळी साजरी करणार आहे.
- श्रद्धा गायकवाड
कोरोनाचं संकट पाहता दिवाळीच्या पहिल्या दिवशी राम मारुती रोडसारख्या सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी न जाता, एखाद्या निवांत ठिकाणी निवडक मित्रांसोबत दिवाळी साजरी करणे पसंत करेन.
- कौस्तुभ बांबरकर
दिवाळीच्या पहिल्या दिवशी मित्रमंडळींना भेटायला जाणे टाळणे योग्य आहे. डिसेंबर महिन्यामध्ये माझे लग्न असल्यानेही मी दिवाळीमध्ये राम मारुती रोडला न जाणे योग्य ठरेल.
- श्वेता वाणी
दिवाळी पहाटला मित्रमंडळींना भेटणे हा नेम चुकवणं योग्य नाही. अनलॉक ५ नंतर दिल्या गेलेल्या सवलतींचा जबाबदारीने उपयोग करून, मित्रांना भेटायला मी राम मारुती रोडला नक्की जाईन. वर्षभराची मरगळ झटकण्यासाठी हे एक उत्तम निमित्त असेल.
- वेदाक्ष जोशी
दरवर्षी ब्रदर्स ग्रुपच्या वतीने लहान मुले आणि महाविद्यालयीन मुलांचे सादरीकरण असते. यंदा कोरोनामुळे हा कार्यक्रम रद्द केला असून तलावपाळीला दीपोत्सव साजरा करण्याचा मानस आहे.
- संजय म्हसे पाटील, ब्रदर्स ग्रुप
राम मारुती रोड येथे विविध कार्यक्रम दिवाळीच्या पहिल्या दिवशी होत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी आयोजकांनी कार्यक्रम रद्द केले आहेत. ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान दरवर्षी विशेष मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करीत असते. यंदा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
- डॉ. राजेश मढवी, ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान