CoronaVirus: ठाण्यात जूनच्या २४ दिवसांत आढळले तीन हजार ९२६ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 01:00 AM2020-06-26T01:00:57+5:302020-06-26T01:01:02+5:30
असले तरी शहरात कोरोनाचे आता नवे हॉटस्पॉट तयार झाले असून घोडबंदर, वर्तकनगर, नौपाडा कोपरी, उथळसर येथे कोरोनाच्या रुग्णात कमालीची वाढ झाली आहे.
ठाणे : ठाण्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचे अवघे ३१० रुग्ण होते. मे महिन्यात ही संख्या २९०१ एवढी झाली. तर आतापर्यंत म्हणजेच २४ जूनअखेर शहरात ६८२७ कोरोना रुग्ण झाले आहे. परंतु, एप्रिल आणि मेच्या तुलनेत जूनच्या अवघ्या २४ दिवसांत शहरात नवे ३९२६ रुग्ण आढळले असून १५० नागरिकांचा मृत्यू झाला असून याच कालावधीत २२६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. असले तरी शहरात कोरोनाचे आता नवे हॉटस्पॉट तयार झाले असून घोडबंदर, वर्तकनगर, नौपाडा कोपरी, उथळसर येथे कोरोनाच्या रुग्णात कमालीची वाढ झाली आहे. शिवाय सोसायट्यांमध्ये आता रुग्ण आढळत आहेत.
शहरात घोडबंदर अर्थात माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत बाधीतांची संख्या वाढतांना दिसत आहे. या येथे झोपडपट्ट्यांबरोबरच सोसायटींमध्येही आता कोरोनाने जोरदार शिरकाव केला आहे. मानपाडा गावात रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथील प्रवेशद्वारच लॉक करून कोणालाही बाहेर अथवा बाहेरच्याला आत प्रवेश नाकारला असला तरी चोरी चुपके येथे ये जा सुरूआहे. दुसरीकडे येथील उच्चभ्रू सोसायटींमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. या पट्ट्यात आता दिवसाला २५ ते ३० नवे रुग्ण आढळत आहेत. हीच परिस्थिती वर्तकनगर, उथळसर, नौपाडा आणि कोपरीतही आहे. याठिकाणीदेखील कोरोनाची साखळी तयार होत असून दिवसाला २० ते ३० नवे रुग्ण आढळत आहेत.
एकीकडे लोकमान्यनगर, वागळे इस्टेट या हॉटस्पॉटमधील रुग्णांची संख्या आता आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. परंतु, दुसरीकडे नवे हॉटस्पॉट तयार होत असल्याने महापालिकेच्या चितेंत वाढ होऊ लागली आहे.
>रुग्ण दुप्पट होण्याचा
शहरात वेग वाढला
शहरातील रुग्ण दुपटीचा वेग आणि कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. एप्रिल महिन्यात अवघे ३१० कोरोनाचे रुग्ण होते. तर, ११ जणांचा मृत्यू झाला होता. ५४ नागरिकांनी कोरोनावर मात केली होती. तर मे महिन्यात रुग्णांची संख्या २९०१ एवढी होऊन ७३ जणांचा मृत्यू झाला. तर ११८३ जणांनी कोरोनावर मात केली.