उल्हासनगरात अतिधोकादायक इमारतींवर महानगरपालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 11:58 PM2020-09-24T23:58:38+5:302020-09-24T23:58:50+5:30
भिवंडीच्या दुर्घटनेतून बोध : १५0 धोकादायक इमारतींची यादी तयार, ३0 इमारती केल्या खाली, पाडकामाला सुरुवात केल्याने खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिकेने १५० धोकादायक इमारतींची यादी पावसाळ्यापूर्वीच जाहीर केली असून भिवंडीतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याचे ठरवले आहे. अतिधोकादायक ३० इमारती रिकाम्या केल्या आहेत. त्यापैकी हमलोग, शांती पॅलेस, ओम शिवगंगा इमारतींवर अतिक्रमण विभागाने गुरुवारपासून पाडकाम सुरू केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.
उल्हासनगरमध्ये दरवर्षी इमारती कोसळून अनेकांचे बळी गेले आहेत. भिवंडी येथील धोकादायक इमारत कोसळून ४० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून असंख्य जखमी झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर उपायुक्त मदन सोंडे यांनी कॅम्प नं-१ मधील हमलोग, कॅम्प नं-२ मधील शांती पॅलेस व कॅम्प नं-४ मधील ओम शिवगंगा या अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पथकाने तिन्ही इमारतींवर कारवाई सुरू केली आहे. धोकादायक इमारतींच्या यादीत नसलेल्या अन्य इमारतींचे सर्वेक्षण करणार असल्याचे सोंडे यांनी सांगितले.
शहरातील अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली. तर, दुसरीकडे १३० धोकादायक इमारतींना पावसाळ्यापूर्वी नोटिसा देऊन नागरिकांना इमारती रिकाम्या करण्यास सांगितले होते. मात्र, रहिवाशांना पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आली आहे.
धोकादायक इमारतींची संख्या वाढणार
शहरात १९९० ते ९५ दरम्यान रेतीपुरवठा बंद असल्याने, त्यावेळी बांधण्यात आलेल्या बहुतांश इमारतींमध्ये रेतीऐवजी दगडांचा चुरा व वाळवा रेती यांचा वापर करीत होते. त्याकाळातील बहुतांश इमारती धोकादायक होत असल्याने त्यांचे नव्याने सर्वेक्षण करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे धोकादायक इमारतींची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.