दुर्गाडी किल्ल्यासमोरील बेकायदा बांधकामांना मनपाचा वरदहस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:26 AM2021-06-19T04:26:37+5:302021-06-19T04:26:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : दुर्गाडी किल्ला हे कल्याणचे भूषण असून, याचे जतन व संवर्धन करण्याची केडीएमसीची जबाबदारी आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : दुर्गाडी किल्ला हे कल्याणचे भूषण असून, याचे जतन व संवर्धन करण्याची केडीएमसीची जबाबदारी आहे. मात्र, असे असताना किल्ल्यासमोरील बेकायदा बांधकामांना केडीएमसीच्या अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याचा आरोप कल्याण पश्चिमचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला.
दुर्गाडी किल्ल्यासमोरील भटाळे तलाव नामशेष करून तिथे अनेक बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. ती तातडीने काढून टाका व तलाव पुनरुज्जीवित करा, या मागणीसाठी निर्भय सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी पवार यांनी उपोषणस्थळी जाऊन उपोषणाला पाठिंबा दिला. त्या वेळी पवार माध्यमांसमवेत बोलत होते.
भटाळे तलाव येथील बेकायदा बांधकामांबाबत अनेक वेळा निर्भय सामाजिक संस्थेने केडीएमसीची पत्रव्यवहार केला. परंतु, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला, असे ‘निर्भय’चे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रांत चारसकर यांनी सांगितले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष मनीष हिवाळे, सचिव समाधान मुळे, कार्याध्यक्ष मंगेश ठाकूर, ठाणे जिल्हाध्यक्ष आसिया रिझवी आदी उपस्थित होते.
-----------