वृद्धेचा खून करणारा मनपाचा कंत्राटी सफाई कामगार जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:38 AM2021-03-06T04:38:52+5:302021-03-06T04:38:52+5:30
कल्याण : पश्चिमेकडील दत्तआळीतील झुंजारराव बिल्डिंगच्या तळमजल्यावर राहणाऱ्या हंसाबेन प्रवीणभाई ठक्कर या ७० वर्षीय वृद्ध महिलेची धारदार शस्त्राने गळा ...
कल्याण : पश्चिमेकडील दत्तआळीतील झुंजारराव बिल्डिंगच्या तळमजल्यावर राहणाऱ्या हंसाबेन प्रवीणभाई ठक्कर या ७० वर्षीय वृद्ध महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याच्या गुन्ह्याकरिता वासू ऊर्फ विजेंद्र कृष्णा ठाकरे (वय ३५) या केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील घंटागाडीवरील कंत्राटी सफाई कामगाराला पोलिसांनी अटक केली आहे. ठक्कर यांच्या घरातील पैसे व दागिने चोरण्याच्या हेतूने मागील शनिवारी ही हत्या करण्यात आली होती.
आरोपीने हत्या केल्यानंतर कोणताही पुरावा घटनास्थळी सोडला नव्हता. त्यामुळे या गुन्ह्याचा छडा लावणे बाजारपेठ पोलिसांसमोर आव्हान होते. कल्याण पूर्व प्रादेशिक विभाग अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र अहिरे यांनी कसोशीने केलेल्या तपासात हंसाबेन यांच्या घराच्या परिसरात केरकचरा काढण्यासाठी अधूनमधून येणाऱ्या वासू ऊर्फ विजेंद्रवर संशयाची सुई खिळली होती. तो केडीएमसीत कंत्राटी सफाई कामगार होता. सकाळी तो कामावर जायचा व संध्याकाळी हंसाबेन राहत असलेल्या परिसरात पावभाजीची गाडी लावायचा. त्याने हत्येच्या घटनेच्या आधी पाच दिवस हंसाबेन यांच्या घरावर सतत पाळत ठेवली होती. तो कचरा गोळा करतो हे माहीत असल्याने हंसाबेन यांनी त्याला घरामागे साचलेला कचरा साफ करण्यास सांगितले होते. त्याचा फायदा उठवित तो चोरी करण्यासाठी घरात घुसला; परंतु कपाटाची चावी न मिळाल्याने त्याचा चोरीचा प्रयत्न सफल झाला नाही. आपले बिंग फुटणार म्हणून त्याने हंसाबेन यांची हत्या केल्याचे तपासात उघड झाले. आरोपीला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
------------------------------------------------------
वाचली