पालिकेचे कंत्राटी डॉक्टर पगारापासून वंचित
By admin | Published: December 16, 2015 12:28 AM2015-12-16T00:28:09+5:302015-12-16T00:28:09+5:30
अंबरनाथ नगरपरिषदेच्या छाया रुग्णालयातील कंत्राटी डॉक्टरांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन दिलेले नाही. त्यामुळे त्यांनी सेवा देण्याचे काम बंद केले आहे. रुग्णालयात डॉक्टरांची
- पंकज पाटील, अंबरनाथ
अंबरनाथ नगरपरिषदेच्या छाया रुग्णालयातील कंत्राटी डॉक्टरांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन दिलेले नाही. त्यामुळे त्यांनी सेवा देण्याचे काम बंद केले आहे. रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.
१९७८ मध्ये अंबरनाथ नगरपरिषदेने ६२ खाटांचे डॉ.बी.जी.छाया नावाने रुग्णालय सुरु केले होते. रुग्णालय सेवा देणारी राज्यातील पहिली नगरपरिषद म्हणून अंबरनाथचे नाव गौरविण्यात येत होते. सर्वात चांगली सेवा म्हणून छाया रुग्णालयाची ओळख होती. मात्र आज ही परिस्थिती बदलली आहे. सेवेचे तर सोडाच परंतु, प्राथमिक उपचार देण्यातही हे रुग्णालय कमी पडत आहे. ज्यावेळी रुग्णालय सुरु झालेले त्यावेळेस शस्त्रक्रीया विभाग, एक्स रे मशिन आणि सर्व तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध होती. मात्र आज पालिकेचे केवळ तीन डॉक्टरच संपूर्ण रुग्णालय हाताळत आहेत. रुग्णांचा वाढता ओघ लक्षात घेऊन येथे डॉक्टर घेण्याची गरज होती. नविन डॉक्टरांची नेमणूक होईपर्यंत येथे कंत्राटी डॉक्टरांची भरती केली होती. त्यानुसार ठोक पगारावर ८ कंत्राटी डॉक्टरांची नेमणूक येथे केली होती. या डॉक्टरांना महिन्याला नियमित पगार देणे पालिकेला बंधनकारक होते. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून त्यांचे पगारच दिलेले नाहीत. त्यामुळे ८ पैकी ४ डॉक्टरांनी आपली सेवा बंद केली आहे. डॉक्टरांनी अचानक हे पाऊल उचलल्याने त्याचा ताण रुग्णालयावर पडला आहे. दररोज ४०० हुन अधिक रुग्ण बाह्य रुग्णसेवेचा लाभ घेत असतात. आता डॉक्टरांची कमतरता पडल्याने त्यांचे हाल होत आहेत. अल्प दरात सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे पगार न देण्याचे काम पालिकेने करुन नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळण्याचे काम केले आहे.
‘ डॉक्टरांना पगार मिळालेले नाही कळताच ते लागलीच काढण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यापुढे अशी चुक होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे. या रुग्णालयात नविन डॉक्टर्सची मागणी शासनाकडे केली आहे.
- गणेश देशमुख,
मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपरिषद