जोगिला मार्केटवरील १८६ बांधकामांवर पालिकेचा हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:03 AM2018-06-01T01:03:10+5:302018-06-01T01:03:10+5:30
जोगिला तलावात भरणा टाकून त्याठिकाणी झालेली बांधकामे हटवण्याची कारवाई अखेर गुरुवारपासून सुरू झाली. बाधितांनी त्याच ठिकाणी पुनर्वसनाची मागणी होती
ठाणे : जोगिला तलावात भरणा टाकून त्याठिकाणी झालेली बांधकामे हटवण्याची कारवाई अखेर गुरुवारपासून सुरू झाली. बाधितांनी त्याच ठिकाणी पुनर्वसनाची मागणी होती. परंतु, ती विचारात न घेता पालिकेने ३०० पोलिसांच्या बंदोबस्तात पहिल्या दिवशी १८६ बांधकामांवर हातोडा टाकला. यावेळी स्थानिकांनी अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची भेट घेऊन कारवाई थांबवण्याचे आवाहन केले होते.
मागील दोन वर्षांपासून ठाणे महापालिकेने शहरातील अनेक रस्ते अतिक्रमणमुक्त केले आहेत. त्यानंतर, गेले काही महिने थांबलेली कारवाई आता पुन्हा नव्याने सुरू केली आहे. तिला प्रथमच स्थानिकांनी विरोध करून ४८ तासांचा अल्टीमेटम देऊन त्याच ठिकाणी पुनर्वसनाची मागणी केली होती. परंतु, असे असतानादेखील गुरुवारपासून पालिकेने कारवाईला पुन्हा सुरुवात केली. त्यानुसार, उथळसर भागातील जोगिला मार्केट येथील तलाव बुजवून त्याठिकाणी झालेल्या बांधकामांवर हातोडा मारला.
यावेळी सुरुवातीला रहिवाशांनी या कारवाईला विरोध केला. परंतु, पोलीस बंदोबस्तात पालिकेने ही कारवाई केली. त्यानंतर, तिला स्थगिती मिळावी म्हणून न्यायालयातदेखील धाव घेतली. परंतु, तोपर्यंत पालिकेने रहिवाशांची घरे खाली करून त्यांच्यावर बुलडोझर फिरवला.
दरम्यान, या रहिवाशांचे तात्पुरत्या स्वरूपात खेवरा सर्कल येथील रेंटलच्या नव्या इमारतीत पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यानंतर, दोन महिन्यांत त्यांना हक्काचे घर दिले जाईल, असे पालिकेने स्पष्ट केले. त्यामुळे तोपर्यंत त्यांच्याकडून रेंटलच्या घरांचे कोणत्याही स्वरूपात भाडे घेतले जाणार नसल्याची ग्वाही अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. तरीदेखील निवारा हक्क समन्वय समितीने ही कारवाई टाळण्यासाठी चव्हाण यांच्याकडे विनंती केली. परंतु, तरीही कारवाई सुरूच होती. आता राहत आहोत, त्यापेक्षा चांगले घर मिळणार म्हणून आणि हक्काचे घर जातेय म्हणून काही रहिवाशांच्या डोळ्यांत अश्रूू तर काहींच्या डोळ्यांत हसू दिसत होते. भरउन्हातच ही कारवाई होत असल्याने अनेकांचे संसार एका क्षणात उघड्यावर आले.