प्रभाग समिती सदस्याने औषध फवारणी पंप खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा नगरसेवकाचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:36 AM2021-03-15T04:36:33+5:302021-03-15T04:36:33+5:30
मीरा रोड : बाजारभावापेक्षा जास्त दराने कीटकनाशक फवारणी पंप खरेदी करून, प्रभाग समिती सदस्य आणि संबंधित पालिका अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार ...
मीरा रोड : बाजारभावापेक्षा जास्त दराने कीटकनाशक फवारणी पंप खरेदी करून, प्रभाग समिती सदस्य आणि संबंधित पालिका अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेस आघाडीचे नगरसेवक राजीव मेहरा यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. प्रभाग समिती सभापतींच्या पालिका लेटरहेडचाही यासाठी गैरवापर केला गेला आहे.
महापालिकेच्या मीरा रोड, काशिमीरा भागासाठीच्या प्रभाग समिती ६ चे भाजपचे स्वीकृत सदस्य असलेले सजी आय. पी. यांनी शांतिपार्क आदी भागातील निवडक इमारतींना महापालिकेच्या निधीतून खरेदी केलेले कीटकनाशक फवारणीचे पंप हे स्वतःचे नाव लावून कोरोना काळात वाटले. प्रभाग समिती निधीतून प्रत्येकी ८ हजार ८५० रुपये दराने १०० पंप खरेदी केले गेले व त्यासाठी पालिकेने ९ लाख ९१ हजार रुपये ठेकेदारास दिले, परंतु सदर पंपाची खुल्या बाजारातील किंमत खूपच कमी असल्याचे नगरसेवक मेहरा यांनी ४ महिन्यांपूर्वीच पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते, असे सांगत खरेदीतील भ्रष्टाचारप्रकरणी कारवाईची मागणी केल्याचे राजीव मेहरा म्हणाले. त्यातच सदर प्रकरणी तत्कालीन सभापती असलेल्या भाजप नगरसेविका विणा भोईर यांनीही, सजी आय.पी. यांनी त्यांच्या पालिकेच्या लेटरहेडचा दुरुपयोग केला असल्याची तक्रार आयुक्तांकडे केली आहे. समिती सदस्य सजी आय.पी. यांनी सभापतींचे खोटे पत्र बनवून निधी घेतल्याचा आरोप केला आहे. या खरेदी घोटाळाप्रकरणात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नगरसेवक अनिल सावंत यांनी केली आहे. १५ दिवसांत सदर प्रकरणाची चौकशी करून कारवाई न झाल्यास कायदेशीर मार्गाने लढाई सुरू केली जाईल, असे ते म्हणाले.
सजी आय.पी. यांनी आपण सभापतींचे बोगस पत्र दिलेले नसून कीटकनाशक फवारणी पंप हे महापालिकेने खरेदी केलेले आहेत, असा खुलासा केला आहे. या प्रकरणी आपणही आयुक्तांना चौकशी करण्याचे पत्र दिले आहे, असे ते म्हणाले.