भाईंदर पुर्वेला कमी पाणी पुरवठा केला जात असल्याने नगरसेवक आक्रमक; आयुक्त घेणार बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 04:06 PM2021-09-29T16:06:31+5:302021-09-29T16:07:31+5:30
"शहरातील नागरिकांमध्ये पाणी वाटपात भेदभाव करणे संतापजनक असून सत्ताधारी भाजपसह पालिका प्रशासन मात्र पाणी वाटपात भेदभाव करत आहे."
मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या तुलनेत भाईंदर पूर्वला कमी पाणी दिले जात असल्याने शहरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून पाणी देण्यात केला जाणारा भेदभाव तत्काळ दूर करावा. तत्काळ समान पाणी वाटप करावे, अशी मागणी शिवसेना नगरसेवकांनी केली आहे. (The corporator is aggressive as there is less water supply to Bhayander East)
भाईंदर पूर्व भागातील शिवसेना नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, गटनेत्या नीलम ढवण, तारा घरत, दिनेश नलावडे, धनेश पाटील, वंदना पाटील, जयंतीलाल पाटील, अनंत शिर्के, स्नेहा पांडे, कुसुम गुप्ता, संध्या पाटील आदींनी आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह आयुक्त दिलीप ढोले यांची मंगळवारी भेट घेतली.
यावेळी नगरसेवकांनी भाईंदर पूर्व भागात पाणी नेहमीच कमी येत असल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार केला. या भागात दाट वस्ती असताना देखील पाणी मात्र कमी मिळते. पाण्याचा दाब कमी असतो.
शटडाऊन झाल्यास दोन ते तीन दिवस पाणी येत नाही. मिळते तेसुद्धा अतिशय कमी दाबाने येते. त्यामुळे नागरिकांना सतत पाणी टंचाई सहन करावी लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून नगरसेवक म्हणून आम्ही सातत्याने महापालिकेस अर्ज विनंत्या करून देखील पालिकेने प्रश्न सोडवण्यास टाळाटाळ चालवल्याचा आरोप प्रवीण पाटील यांनी केला.
शहरातील नागरिकांमध्ये पाणी वाटपात भेदभाव करणे संतापजनक असून सत्ताधारी भाजपसह पालिका प्रशासन मात्र पाणी वाटपात भेदभाव करत आहे, असे दिनेश नलावडे यांनी केला आहे. भाईंदर पूर्वेचा पाणि प्रश्न गंभीर असून जनता संतप्त आहे. यामुळे तत्काळ समान पाणी वाटप देऊन हा प्रश्न सोडवा, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना आयुक्त दिलीप ढोले म्हणाले, पालिकेचा समान पाणी वाटपचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी १७ कोटींचा खर्च होणार आहे. तर पाण्यासाठी तुमची स्वतंत्र बैठक घेऊ, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.