महासभेत नगरसेवक आक्रमक
By admin | Published: November 5, 2015 12:42 AM2015-11-05T00:42:13+5:302015-11-05T00:42:13+5:30
अनधिकृत बांधकामांसंदर्भात पालिका आयुक्तांनी तीन नगरसेवकांचे पद रद्द केल्याने याचे पडसाद बुधवारी झालेल्या महासभेत उमटले. अशा पद्धतीने जर कारवाई करायची असेल तर
ठाणे : अनधिकृत बांधकामांसंदर्भात पालिका आयुक्तांनी तीन नगरसेवकांचे पद रद्द केल्याने याचे पडसाद बुधवारी झालेल्या महासभेत उमटले. अशा पद्धतीने जर कारवाई करायची असेल तर सर्वांवरच कारवाई करा, असा सूर नगरसेवकांनी आळवला. आज ७० टक्के नगरसेवक अनधिकृत बांधकामांत राहतात. तर, त्यांच्यावरही सरसकट कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली.
मंगळवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मनसेचे शैलेश पाटील, शिवसेनेचे राम एगडे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक मनोहर साळवी यांचे नगरसेवकपद रद्द केले आहे. तसेच आणखी पाच ते सहा नगरसेवकांवरही कारवाईची टांगती तलवार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु, अशा प्रकारे भीती दाखवायची असेल तर तीन जणांवर कारवाई करण्यापेक्षा एकाच वेळी सर्वांवर कारवाई करावी, असे मत काँग्रेसचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी व्यक्त केले. आज ६५ ते ७० टक्के नगरसेवक हे अनधिकृत बांधकामांत राहतात, म्हणून काय आता त्यांच्यावर कारवाई करणार का, असा सवालही त्यांनी केला.
नगरसेवकांप्रमाणे मतदारही अनधिकृत बांधकामात राहतात, मग त्यांचे काय करणार, असा सवाल शिवसेनेचे नगरसेवक सुधीर भगत यांनी केला. या उलट ज्या अधिकाऱ्यांमुळे शहरात अनधिकृत बांधकामे वाढली आहेत, त्यासंदर्भात नगरसेवक अथवा सर्वसामान्य ठाणेकर तक्रार करूनही त्या बांधकामांवर कारवाई होत नसेल तर त्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई का नाही, असा भेदभाव कशासाठी, असा सवालही काही सदस्यांनी केला. अनधिकृत बांधकामांत ज्या पद्धतीने नगरसेवकांना दोषी मानले जात आहे, त्याप्रमाणे अधिकारीही त्याला तितकेच दोषी असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. (प्रतिनिधी)