नगरसेविका घोलप यांनी राजीनामा द्यावा
By admin | Published: July 3, 2017 06:11 AM2017-07-03T06:11:37+5:302017-07-03T06:11:37+5:30
सफाई कर्मचाऱ्यांनी लावलेल्या होर्डिंग्जवरील छायाचित्रांमध्ये त्या व्यक्तींनी दागदागिने घातल्याचे दिसल्याने माजी महापौर व शिवसेनेच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : सफाई कर्मचाऱ्यांनी लावलेल्या होर्डिंग्जवरील छायाचित्रांमध्ये त्या व्यक्तींनी दागदागिने घातल्याचे दिसल्याने माजी महापौर व शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका वैजयंती घोलप यांनी आक्षेप घेत वक्तव्ये केली होती. कोणीही कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू नये. त्यामुळे घोलप यांच्या नगरसेवकपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी रेखा गोपाळ बहनवाल यांनी केली आहे.
बहनवाल यांनी शनिवारी केडीएमसी मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांची भेट घेत ही मागणी केली. सफाई कामगार अजय जानू सावंत या सफाई कामागाराच्या अंगावरील दागदागिन्यांबद्दल घोलप यांनी आक्षेप घेत वक्तव्य केली होती. अजय यांची आई बांधकाम व्यावसायिक आहे. त्यामुळे त्यांच्याकडे संपत्ती असू शकते. त्यातच, अजय हे मे महिन्यापासून वैद्यकीय रजेवर होते, असे त्यांनी घरत यांना सांगितले. त्यावर घरत म्हणाले, सध्या आयुक्त वेलरासू प्रशिक्षणासाठी मसुरीला आहेत. त्यामुळे घोलप यांच्या व्यक्तव्याबाबत चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.
रेनकोट, गमबूट आणि मास्कअभावी सफाई कर्मचाऱ्यांना काम करण्यात अडचणी येतात. या साहित्यासाठी दोन वर्षे वर्षे प्रतीक्षा करावी लागते, हे योग्य नाही.
या कामगारांचे आरोग्य सुरक्षित राहिले, तर ते स्वच्छता ठेवतील. त्यातही मोठ्या प्रतीक्षेनंतर त्यांना मिळणारे साहित्यही हीन दर्जाचे आहे, ही बाब गंभीर आहे, असे बहनवाल म्हणाल्या. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
आठ हजार सफाई कर्मचारी हवेत
केडीएमसी हद्दीतील लोकसंख्येनुसार आठ हजार सफाई कर्मचारी हवेत. पण, अवघे दोन हजार २७२ कर्मचारी आहेत. २७ गावांमध्ये ७९९ कर्मचारी आहेत. त्यात सफाई आणि काही कार्यालयीन कर्मचारी आहेत.
या कर्मचाऱ्यांना समान वेतन मिळावे, पाच लाखांचा आरोग्य विमा मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली. कर्मचाऱ्यांना सध्या दोन गणवेश मिळतात. त्याचे तीन व्हावेत आणि सार्वजनिक सुट्या मिळाव्यात, या मुद्यावरही त्यांनी चर्चा केली.
सफाई कर्मचाऱ्यांसंदर्भातील वक्तव्याला नाहक जातीपातीचा रंग दिला जात आहे. मी केवळ उदाहरण म्हणून त्यासंदर्भात नाव घेऊन बोलले. त्या वेळी माझ्यासह अन्य नगरसेवकांनीही कोणाचेही नाव न घेता माझ्या म्हणण्यात तथ्य असल्याचे म्हटले. जे मी बोलले ते बोललेच, पण त्यामुळे जे होईल त्याला मी सामोरे जाईनच.
- वैजयंती घोलप-गुजर,
ज्येष्ठ नगरसेविका, शिवसेना