नगरसेवक कुणाल पाटील यांनी घेतली लोकसभा अध्यक्ष ओम बिरलांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 02:08 PM2020-10-06T14:08:10+5:302020-10-06T14:09:30+5:30
लोकसभा अध्यक्ष बिरला यांच्या वडिल श्रीकृष्ण बिरला यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या वडिलांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम राजस्थान येथील कोटा गावी आयोजित करण्यात आला होता.
कल्याण-लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची त्यांच्या कोटा येथील गावी जाऊन नगरसेवक कुणाल पाटील यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील समस्याविषयी एक निवेदन दिले. हे निवेदन बिरला यांनी स्विकारले असून लवकर कल्याण डोंबिवली महापालिकेस भेट देणार असल्याचे आश्वासन पाटील यांना दिले आहे.
लोकसभा अध्यक्ष बिरला यांच्या वडिल श्रीकृष्ण बिरला यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या वडिलांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम राजस्थान येथील कोटा गावी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास नगरसेवक पाटील यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी लोकसभाध्यक्ष बिरला यांची भेट घेऊन त्यांना कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील समस्यांविषयी एक निवेदन दिले आहे. महापालिका हद्दीत कच:याची समस्या आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील खड्डे भरले जात नाहीत. राज्य सरकारने महापालिकेतून 18 गावे वगळली आहे. त्यासाठी अद्याप प्रशासक नेमलेले नाही. या 18 गावातील रस्त्यावरील खड्डे बुजविले जात नाहीत. 18 गावातील कचरा उचलला जात नाही. वगळण्यात आलेल्या गावातील नागरीक अधांतरी आहेत. त्यांच्या नागरी सोयी सुविधांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी व राज्य सरकारकडेही मागणी करुनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. या सगळ्य़ा प्रकरणात आपण लक्ष घालावे असे निवेदन पाटील यांनी दिले आहे. हे निवेदन लोकसभा अध्यक्ष बिरला यांनी स्विकारुन लवकर कल्याण डोंबिवली शहराला आपण भेट देऊ असे आश्वासन पाटील यांना दिले आहे.