नगरसेवक सुधाकर चव्हाण यांना अटक
By admin | Published: November 10, 2015 02:55 AM2015-11-10T02:55:01+5:302015-11-10T02:55:01+5:30
बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्ये-प्रकरणी ‘सुसाइड नोट’मुळे मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामिनावर असलेले मनसेचे माजी गटनेते तथा
येऊरच्या बंगल्यात बेकायदा मद्यसाठा
ठाणे : बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्ये-प्रकरणी ‘सुसाइड नोट’मुळे मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामिनावर असलेले मनसेचे माजी गटनेते तथा नगरसेवक सुधाकर चव्हाण यांना बेकायदेशीर विदेशी दारू बाळगल्याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या येऊर येथील बंगल्यातून ६२ बाटल्यांमधील ५२ हजार २०० रुपयांचे विदेशी मद्य जप्त केले.
परमार प्रकरणात काँग्रेसचे माजी गटनेते विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नजीब मुल्ला, ठामपाचे तत्कालीन विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे आणि सुधाकर चव्हाण यांना मुंबई उच्च न्यायालयाने २ डिसेंबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र, या प्रकरणाची सुनावणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यानच्या काळात सहायक पोलीस आयुक्त दिलीप गोरे आणि वर्तकनगर पोलिसांच्या विशेष पथकाकडून सोमवारी दिवसभर चव्हाणांच्या येऊर येथील निवासस्थानी झडती घेतली. यात परमार प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांचा शोध घेत असताना एका खोलीत पथकाला वेगवेगळ्या बड्या कंपन्यांच्या विदेशी मद्याचा साठा मिळाला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनीही याप्रकरणी त्यांची चौकशी केली आहे.