तीन अपत्य असलेल्या महिलेचे नगरसेवकपद धोक्यात, माहेरच्या नावाने बनली नगरसेविका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 04:14 PM2017-11-28T16:14:03+5:302017-11-28T16:14:32+5:30
तीन अपत्य असलेल्या महिलेने नगरसेविका होण्यासाठी निवडणूक आयोगाकडे आपल्या माहेरील पुरावे सादर करून निवडणूकीत निवडून आली. याबाबत निवडणूक विभागाकडे माजी नगरसेवकाने तक्रार केल्यानंतर त्याची दखल घेत त्यांनी आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले आहेत.
भिवंडी : तीन अपत्य असलेल्या महिलेने नगरसेविका होण्यासाठी निवडणूक आयोगाकडे आपल्या माहेरील पुरावे सादर करून निवडणूकीत निवडून आली. याबाबत निवडणूक विभागाकडे माजी नगरसेवकाने तक्रार केल्यानंतर त्याची दखल घेत त्यांनी आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले आहेत.
महानगरपालिकेच्या मे २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शहरातील गौरीपाडा खजूरपुरा या परिसरांतील प्रभाग क्र.७ अ मधून साजीदाबानो इश्तियाक मोमीन या निवडून आल्या आहेत. हे त्यांचे माहेरचे नांव आहे. म्हणून त्यांचा आपत्यांचा उल्लेख झालेला नाही. या पुर्वी याच महिलेने सन २०१२च्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत याच परिसरांतील वार्डातून आपल्या पतीच्या नावे म्हणजे अन्सारी साजीदा रईस या नावाने नामनिर्देशनपत्र भरले होते. मात्र त्यांना दोन पेक्षा जास्त मुले असल्याने त्यांचे नामनिर्देशन पत्र बाद झाले होते.असे असताना त्यांनी २०१७ मध्ये आपल्या वडिलांचे नाव लावून माहेरच्या नावाने नामनिर्देशन अर्ज भरला आणि स्वत:ची माहिती लपवून निवडणूक विभागाची फसवणूक केली, असा आरोप माजी नगरसेवक अनिस खलील मोमीन यांनी केला. तसेच या बाबतची सर्व पुरव्याची कागदपत्रे देऊन अनिस मोमीन यांनी नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी निवडणूक विभाग व पालिका आयुक्तांकडे केली आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी अ.गो.जाधव यांनी नामनिर्देशना सोबत उमेदवाराने द्यावयाच्या शपथपत्रात चुकीची माहिती दिल्यास त्याची चौकशी करून कारवाई करावी, असे आदेश पालिका आयुक्त योगेश म्हसे यांना दिले. या बाबत पालिका आयुक्त म्हसे यांनी ३ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेतली असून येत्या दोन दिवसांत दुसरी सुनावणी आयुक्त घेणार आहे. त्यामुळे साजेदाबाने इश्तियाक मोमीन यांच्या नगरसेविका पदावर टांगती तलवार आहे. दोन दिवसांपुर्वी काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद अरशद मोहम्मद असलम अंन्सारी यांचा जातीचा दाखल जातपडताळणी विभागाने रद्द केल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द होण्याच्या मार्गावर आहे. आता साजीदाबानो इश्तियाक मोमीन यांच्या बाबत आयुक्त काय निर्णय जाहिर करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.