शिंदेंच्या निर्णयापूर्वीच राजीनामा झाला बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:44 AM2017-07-27T00:44:29+5:302017-07-27T00:44:33+5:30
केडीएमसीच्या भ्रष्ट कारभाराच्या निषेधार्थ दिलेला नगरसेवकपदाचाा राजीनामा आयुक्त पी. वेलरासू यांना दिल्याचा दावा सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी पुन्हा केला
कल्याण : केडीएमसीच्या भ्रष्ट कारभाराच्या निषेधार्थ दिलेला नगरसेवकपदाचाा राजीनामा आयुक्त पी. वेलरासू यांना दिल्याचा दावा सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी पुन्हा केला. पालिकेच्या नागरी सुविधा केंद्राने राजीनामा स्वीकारल्याची प्रत त्यांनी दाखवली. पण हा राजीनामा बुधवारीही मिळाला नसल्याचे स्पष्टीकरण आयुक्त कार्यालयाने दिल्याने म्हात्रेंच्या राजीनाम्याचे गूढ वाढले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे या राजीनाम्यावर निर्णय घेणार असताना तो बेपत्ता होण्याचे गूढ वाढले आहे.
म्हात्रे यांनी सोमवारी महापौर राजेंद्र देवळेकर आणि आयुक्त पी. वेलरासू यांना हा राजीनामा पाठविला. तो आयुक्तच नव्हे, तर महापौरांनीही राजीनामा मिळाला नसल्याचे सांगितले. यावर म्हात्रेंनी महापौरांच्या दप्तरी राजीनामा जमा झाला असून, ते खोटे बोलत असल्याचा आरोप केला. आयुक्तांनाही राजीनामा दिल्याचा दावा त्यांनी बुधवारी पुन्हा केला.
फेरीवाला अतिक्रमण, पाणीचोरी, अन्यायकारक वसुली, अधिकाºयांची लाचखोरी, टॉवर आणि इमारती यांना कर लावण्यात होत असलेली टाळाटाळ यामध्ये महापालिकेचे कोटयावधी रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप करत म्हात्रेंनी राजीनामा दिला आहे.
शिवसेनेत सारे गप्प
म्हात्रे यांचा राजीनामा ही शिवसेनेसाठी नामुष्कीची बाब असली तरी त्यावर शिंदे निर्णय घेईपर्यंत कोणी बोलण्यास तयार नाही. यासंदर्भात केडीएमसीतील शिवसेनेचे गटनेते रमेश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. वामन म्हात्रे हे त्यांच्या कामाच्या वेगळ््या पद्धतीबद्दल प्रसिद्ध असल्याने शिवसेनेतील अनेक नेते त्याबद्दल काही बोलण्यास तयार नाहीत.