पाण्यासाठी नगरसेवकाचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 12:50 AM2021-01-12T00:50:21+5:302021-01-12T00:50:41+5:30
आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या : ठामपाने दिले लेखी आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : खिडकाळी भागात शनिवारी एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने मुंब्रा, दिव्यासह इतर भागांना मागील चार दिवसांपासून पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. टँकरेनेही अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे मुंब्रा, कौसा भागांची पाणीटंचाईतून सुटका व्हावी, या मागणीसाठी मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांनी महापालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनाबाहेर सोमवारी हातात हंडा घेऊन ठिय्या आंदोलन केले. पाणीपुरवठा विभागाने लेखी आश्वासन दिल्यानंतर अखेर त्यांनी आंदोलन मागे घेतले.
मागील काही दिवसांपासून वारंवार जलवाहिनी फुटत असल्याने, अनेक भागांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यात कळवा, मुंब्रा भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीकडून शटडाऊनही घेतले जात आहे. त्यामुळे या भागात आधीपासूनच पाण्याची टंचाई सतावत आहे. त्यात शनिवारी खिडकाळी येथे एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने कळवा, मुंब्रा, दिवा भागाला पाणीटंचाईच्या झळा अधिक सहन कराव्या लागल्या. आधीच वारंवार घेतले जाणारे शटडाऊन आणि त्यात जलवाहिनी फुटल्याने मुंब्रा, कौसा भागाला पाणीटंचाई अधिक प्रमाणात सहन करावी लागत आहे. त्यातही जलवाहिनी दुरुस्त झाल्यानंतरही अद्यापही या भागातील ९० टक्के जनतेला पाणी मिळाले नसल्याचा आरोप करून पठाण यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर हे आंदोलन केले. यावेळी अशी आपत्कालीन परिस्थिती भविष्यात निर्माण झाल्यास स्टेमकडून या भागाला तात्पुरत्या स्वरूपात पाणीपुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली, तसेच मुंब्रा प्रभाग समितीअंतर्गत पाणीपुरवठा विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाणवा असून, त्या जागाही तत्काळ भरून पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, आयुक्त एका मीटिंगसाठी गेले असल्याने पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर धाव घेऊन त्यांची समज काढण्याचा प्रयत्न केला, परंतु लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आपण येथून उठणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
‘शटडाऊनची माहिती कळवणार’
एमआयडीसीकडून कमीत कमी शटडाऊन घेतला जाईल, तसेच शटडाऊनची माहिती पालिका आणि स्थानिकांना कळविण्यात येईल, या काळात पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील राहिल, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल, तसेच मुंब्रा प्रभाग समितीसाठी पूर्णवेळ कनिष्ठ अभियंता व उपअभियंता तीन दिवसांत देण्यासाठी आयुक्तांबरोबर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त नगरअभियंता अर्जुन अहिरे आणि पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार यांनी दिले.