तलावांमध्ये उभारलेल्या काँक्रीट भिंतीवरून नगरसेवक संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 06:11 PM2021-10-27T18:11:21+5:302021-10-27T18:11:31+5:30
शहरातील सार्वजनिक तलावात पर्यावरण व माश्याना घातक अश्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या रासायनिक रंगाच्या श्रीगणेश व देवीच्या मूर्त्यांचे विसर्जन केले जाते.
मीरारोड - पाणथळ म्हणून संरक्षित असलेल्या नैसर्गिक तलावांमध्ये चक्क काँक्रीटच्या भिंती बांधण्याच्या मीरा भाईंदर महापालिकेच्या भोंगळ पण मस्तवाल कारभारा विरुद्ध महासभेत नगरसेवकांनी जाब विचारला. महापौरांनी देखील या प्रकरणी कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. तलावातील भिंतीचा प्रकार लोकमतने समोर आणला होता.
शहरातील सार्वजनिक तलावात पर्यावरण व माश्याना घातक अश्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या रासायनिक रंगाच्या श्रीगणेश व देवीच्या मूर्त्यांचे विसर्जन केले जाते. या मुळे तलाव प्रदूषित होऊन मासे मरतात तसेच दुर्गंधी पसरते. वास्तविक शाडू मातीच्या मूर्ती बंधनकारक करण्यासह कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन सक्तीचे करण्या ऐवजी महापालिकेने तर थेट तालावांचाच बळी घेतला आहे.
महापालिकेने शहरातील राई, जरीमरी, साईदत्त, सातकरी, गावदेवी, मोर्वा, नवघर जुना, राव, शिवार, एस.एन.कॉलेज समोर, नास्का, गोडदेव, मांदली अशा 13 तलावां मध्ये भिंत बांधुन विसर्जनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचा ठेका दिला. या कामाचे २ कोटी ८७ लाखांचे अंदाजपत्रक असले तरी ठेका मात्र तब्बल १६.८८ टक्के वाढिव दराने बोरीवलीच्या स्पार्क सिव्हील इंन्फ्राप्रोजेक्टस या एकाच ठेकेदार कंपनीस दिला.
अनेक तलावात पालिकेने आधीच बेकायदेशीर भराव, कुंपणभिंती सह अन्य विविध बांधकामे केलेली आहे. त्यातच आता मुर्ति विसर्जनाच्या नावाखाली तलावांचे नैसर्गिक अस्तित्वच नष्ट केले आहे. तलावां मध्ये मोठय़ा स्वरुपात काँक्रीट भिंती बांधण्याचे काम केले आहे. मीरारोडच्या शिवार तलावात तर पालिकेने मध्यभागातच काँक्रिटची भिंत बांधून तलावाचे दोन तुकडे पाडून टाकले आहे. वास्तविक शिवार उद्यान हे संरक्षित पाणथळ असताना पालिकेच्या बांधकाम विभागाने हा प्रताप केला आहे.
तलावांचे भिंती उभारून वाटोळे केल्याच्या मुद्द्यावर भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रभात पाटील व काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत यांनी संताप व्यक्त केला. पाणथळ म्हणून तलाव संरक्षित असून मुंबई उच्च न्यायालयाने देखील तसे आदेश दिले आहेत. तरी देखील तलावां मध्ये भिंती बांधण्यात आल्या. ह्या भिंती काढून तलावांचे नैसर्गिक सौंदर्य जपावे अशी आग्रही मागणी करण्यात आली. महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी देखील पालिका प्रशासनास कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
तलाव हे शहराची नैसर्गिक संपत्ती व शान आहेत. पर्यावरणाचे महत्वसह नागरिकांच्या विरंगुळ्यासाठीचे आकर्षण आहे. पण तलावांमध्ये भीती घालणे म्हणजे मुजोरोपणा असल्याचा संताप व्यक्त करत तलावातील भिंती काढून टाका अशी मागणी पाटील, सावंत आदी नगरसेवकांनी केली आहे.