निधीकपातीमुळे नगरसेवक धास्तावले
By admin | Published: February 16, 2017 01:56 AM2017-02-16T01:56:57+5:302017-02-16T01:56:57+5:30
मीरा-भार्इंदर पालिकेच्या अंदाजपत्रकात नगरसेवक निधी १० कोटींनी कमी करून तो केवळ पाच कोटी केला आहे.
भार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिकेच्या अंदाजपत्रकात नगरसेवक निधी १० कोटींनी कमी करून तो केवळ पाच कोटी केला आहे. तर, प्रभागनिधीचा उल्लेखच करण्यात आलेला नाही. आॅगस्टमध्ये निवडणूक होणार असून त्यात नगरसेवक निधीत कपात केल्याने धास्तावून गेले आहेत. मात्र, विकासासाठी स्थायी समिती अंदाजपत्रक व प्रभाग निधीत वाढ केली जाण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर केले असून बुधवारपासून त्यावर चर्चा सुरू झाली आहे. स्थायीमध्ये मान्य झाल्यावर ते महासभेत मंजुरीसाठी सादर केले जाणार आहे. यंदाच्या अंदाजपत्रकात प्रशासनाने ४५८ कोटी ३२ लाखांचे मूळ उत्पन्न असलेले अंदाजपत्रक स्थायीला सादर केले. प्रशासनाने त्यात २४९ कोटी २४ लाखांच्या कर्जासह ५९ कोटी १० लाखांच्या सरकारी अनुदानाची भर घातली आहे. त्यामुळे पुढील वर्षाचे अंदाजपत्रक प्रशासनाने गेल्या वर्षीपेक्षा ५३ कोटींनी वाढवून १ हजार ४४२ कोटींवर आणले. त्यात नगरसेवक निधीसाठी ५ कोटींची तरतूद केली असून प्रभाग निधीला मात्र अंदाजपत्रकातून डच्चू देण्यात आला आहे. गेल्या वर्षी मात्र नगरसेवक व प्रभाग निधीसाठी प्रत्येकी सुमारे १५ कोटींची तरतूद केली होती.
यंदा नगरसेवक निधी १० कोटींनी कमी करत प्रभाग निधीसाठी कोणतीही तरतूद नाही. यंदाच्या निवडणुकीसाठी एका प्रभागातून चार जणांचे पॅनल असेल. या अगोदर प्रभागरचना जाहीर होेणार आहे. नगरसेवक निधीला कात्री लावल्याने नगरसेवकांना काटकसरीने विकास करावा लागण्याची शक्यता आहे. सध्या नगरसेवक व प्रभागांना अनुक्रमे १५ व १० लाखांचा वार्षिक निधी मिळतो. प्रभाग निधीसाठी गेल्या वेळेप्रमाणेच १५ कोटींची तरतूद केली जाण्याची शक्यता असली, तरी त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)