नगरसेवकाची पालिका कर्मचाऱ्यास मारहाण
By admin | Published: October 15, 2016 06:41 AM2016-10-15T06:41:01+5:302016-10-15T06:41:01+5:30
कल्याण-अंबरनाथ रस्त्यावरील बेकायदा बांधकामांची यादी व छायाचित्रे काढण्याचे काम सध्या महापालिका करत आहे. आपल्या बांधकामाचे छायाचित्र काढल्याने
उल्हासनगर : कल्याण-अंबरनाथ रस्त्यावरील बेकायदा बांधकामांची यादी व छायाचित्रे काढण्याचे काम सध्या महापालिका करत आहे. आपल्या बांधकामाचे छायाचित्र काढल्याने नगरसेवक सुजित चक्रवर्ती आणि त्यांच्या अंगरक्षकाने पालिका पथकातील मुकादम अण्णासाहेब बोरुडे यांना मारहाण केली. दरम्यान, या घटनेचा निषेध म्हणून कर्मचारी शनिवारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत.
उल्हासनगरमधील कल्याण-अंबरनाथ रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली अनेक बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. टाटाची उच्च दाबाची विद्युतवाहिनी येथून गेली आहे. या टॉवरजवळ बेकायदा बांधकामे झाली असून उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी अशा बांधकामांवर कारवाई केली.
अशा बांधकामांची छायाचित्रे काढण्याचे काम पालिका पथक करत आहे. यात मुकादम बोरुडे काम करीत होते. बांधकामाचे छायाचित्र काढल्याच्या रागातून चक्रवर्ती यांनी मारहाण केली. दरम्यान, आपण मारहाण केली नसल्याचा कांगावा चक्रवर्ती करत आहेत. महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली उभ्या राहिलेल्या बेकायदा बांधकामांची यादी प्रभाग अधिकारी अजित गोवारी व भगवान कुमावत यांना बनवण्यास सांगितले आहे. यादी पूर्ण झाल्यावर कारवाई होणार आहे. (प्रतिनिधी)