बढतीच्या मुद्यावरून नगरसेवक झाले आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 01:30 AM2020-12-19T01:30:47+5:302020-12-19T01:30:58+5:30
१९ अधिकाऱ्यांना दिलेले कार्यभार बेकायदा होते का, महासभेत नगरसेवकांचा सवाल
ठाणे : रीतसर प्रक्रिया न करता पदोन्नती मिळालेल्या ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी चांगलाच धक्का देऊन नगर अभियंत्यांपासून इतर १९ अधिकाऱ्यांचा अतिरिक्त कार्यभार काढून घेतल्याचे पडसाद शुक्रवारी झालेल्या महासभेत उमटले. अधिकाऱ्यांना दिलेल्या बढत्या चुकीच्या होत्या का? त्यांना कोणत्या कायद्यानुसार बढती दिली किंवा त्यांना आता पुन्हा मूळ पदावर कसे आणले? त्यांना दिलेला कार्यभार हा बेकायदेशीर होता का? असे अनेक प्रश्न करीत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.
यापूर्वी अधिकाऱ्यांना पदांची खैरात दिल्याचा गौप्यस्फोट महापौर नरेश म्हस्के यांनी केला. परंतु, आता ही विस्कटलेली घडी पुन्हा बसवली जात असून आकृतीबंधानुसार पदे भरली जात असल्याने त्यानुसारच इतर विभागांतील अधिकाऱ्यांनादेखील न्याय द्यावा, असे आदेशही त्यांनी दिले. केवळ काही ठरावीक विभागांचे ऑपरेशन न करता सर्वच विभागांचे ऑपरेशन करावे, असेही त्यांनी सांगितले.
महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम, शहरविकास आणि पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता ते कार्यकारी अभियंता यांना वरच्या पदाची खैरात पूर्वी वाटली होती. शर्मा यांनी महापालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की महापालिकेत मंजूर जागा नसतानाही अधिकाऱ्यांना खूश ठेवण्यासाठी त्यांच्याकडे वरिष्ठपदाचा कार्यभार दिला आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी ही खैरात बंद करून १९ अधिकाऱ्यांचे कार्यभार काढून त्यांना मूळ पदावर आणले. याच मुद्द्यावरून या महासभेत विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनी उपरोक्त प्रश्न करून प्रशासनाने उत्तर द्यावे, अशी मागणी केली. याच मुद्द्याला धरून काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनीदेखील यापूर्वीच्या आयुक्तांनी तसेच काही राजकीय मंडळींनी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना अशा प्रकारे आपल्या स्वार्थासाठी पदांची खैरात वाटल्याचा गंभीर आरोप केला. २०१४ पासून पालिकेत हा प्रकार सुरू असून तो चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. अतिरिक्त कार्यभार देत असताना जी काही रिक्त पदे आहेत, ती भरली जात नाहीत, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही ते म्हणाले. यासंदर्भात विचारणा केली असता, केवळ डीपीडीसीचा आधार घेऊन अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार दिल्याचे उत्तर दिले जाते.
शासनाकडून आलेले उपायुक्त येथेच ठाण मांडून असतात, त्यामुळे पालिकेतील अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याचे मत नगरसेवक नारायण पवार यांनी व्यक्त केले.
आकृतिबंधानुसार काढले पदभार
n लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आकृतीबंधानुसारच अधिकाऱ्यांचे कार्यभार काढले आहेत. उपनगर अभियंत्यांची तीन पदे असताना सहा जणांना ती पदे दिली होती. त्यामुळेच यातील तिघांचा अतिरिक्त कार्यभार काढून घेतल्याचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी यावेळी सभागृहाला सांगितले. बदल्या करीत असताना आयुक्तांच्या कर्तव्याचा भाग आहे, परंतु महापौर किंवा इतरांना सांगितल्यास त्यांचे विचारही यात घेतले जातात. त्यानुसार, आता नियमानुसारच जे काही अतिरिक्त कार्यभार दिले होते, ते काढल्याचेही देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. उपायुक्तांची १० पदे मंजूर आहेत, त्यातील ५ शासनाकडून आणि पाच महापालिकेचे असतात, तर १७ ते १८ पदे ही सहायक आयुक्तांची पदे मंजूर असून, त्यातील ८ ते ९ पदे ही शासनाकडून आणि उर्वरित पदे महापालिकेची असतात असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. टप्प्याटप्प्याने इतर अधिकाऱ्यांना जे अतिरिक्त कार्यभार दिलेले आहेत, त्यांनाही मूळ पदावर आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘सर्वच विभागांचे ऑपरेशन करा’
महापालिकेकडून यापूर्वी पदाची खैरात वाटली जात होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट महापौर नरेश म्हस्के यांनी केला. या संदर्भात मी त्यावेळेस पत्रव्यवहारही करून त्यावर कारवाई झाली नव्हती. यापूर्वी चुकीच्या पद्धतीने पदांचे वाटप झाले होते.
त्यामुळे काहींवर अन्यायही झाला आहे. आता प्रशासनाने योग्य पावले उचलली आहेत. आकृतीबंधानुसार ती दिली जात आहेत. त्यानुसार, आता केवळ एकाच विभागाच्या बाबतीत हे ऑपरेशन न करता सर्वच विभागांचे करावे, असे आदेशही म्हस्के यांनी दिले.