नगरसेविकेने सुनेची प्रसुती चक्क पालिका रुग्णालयात करून घेतली 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 07:16 PM2020-09-20T19:16:52+5:302020-09-20T19:24:34+5:30

नगरसेविका सुनेच्या प्रसुतीसाठी पालिका रुग्णालयात आल्यानं कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का

corporators daughter in law delivered baby boy in municipal Hospital at bhayandar | नगरसेविकेने सुनेची प्रसुती चक्क पालिका रुग्णालयात करून घेतली 

नगरसेविकेने सुनेची प्रसुती चक्क पालिका रुग्णालयात करून घेतली 

Next

मीरारोड- पालिका किंवा सरकारी रुग्णालयात उपचार करून घ्यायचे म्हटले की शहरी भागातील राजकारणी, नगरसेवकांचे स्टेट्स आडवे येते. परंतु मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका तारा विनायक घरत यांनी त्यांच्या सुनेची प्रसूती चक्क महापालिकेच्या रुग्णालयात करून घेतली. स्वतः घरत या दिवस रात्र पालिका रुग्णालयात सुनेसोबत थांबल्या होत्या. शनिवारी त्यांच्या नातवाचा पालिका रुग्णालयात जन्म झाला. 

तारा घरत या भाईंदर पूर्व भागातील नगरसेविका आहेत. घरत यांचे पती विनायक घरतदेखील सामाजिक कार्यात झोकून देऊन काम करणारे होते . तारा यांचा मुलगा पवन याची पत्नी बाळंत होणार होती. प्रसुतीसाठी त्यांना कोणतेही खाजगी रुग्णालय सहज उपलब्ध झाले असते. काहींनी खाजगी रुग्णालयाची नावेदेखील सुचवली. परंतु तारा व पवन यांनी महापालिकेचे मीरारोड येथील भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय निवडले. 

एरव्ही मीरा भाईंदर सारख्या शहरी भागातील नगरसेवक, राजकारणी व अधिकारी वर्ग महापालिका किंवा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी फिरकतदेखील नाहीत. त्यांना पालिका रुग्णालयात जाणे कमीपणाचे वाटते. परंतु घरत यांनी त्यांच्या सुनेला प्रसूतीसाठी चक्क पालिकेच्या मीरारोड येथील रुग्णालयात दाखल केले. 

नगरसेविकेची सून पालिका रुग्णालयात प्रसूतीसाठी आल्याने तेथील डॉक्टर व कर्मचारी वर्गास आश्चर्याचा सुखद धक्का बसला. शनिवारी त्यांची सून प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रसूती व्यवस्थित पार पाडली. स्वतः नगरसेविका दिवसरात्र सुनेसोबत रुग्णालयातच होत्या. 

पालिका रुग्णालयात सुनेची प्रसूती जरी व्यवस्थितरित्या पार पडली असली तरी रुग्णालयातील गैरसोयींकडे त्यांनी थेट पालिका आयुक्त डॉ . विजय राठोड आणि कार्यकारी अभियंता दीपक खंबीत यांचे लक्ष वेधले आहे. इतके पैसे खर्च करून देखील रुग्णालयाची दुरावस्था व तेथे असणाऱ्या वस्तुंचा तुटवडा याबद्दलची खंत घरत यांनी बोलून दाखवली . 

पालिका रुग्णालयात डॉक्टर, औषधे, कर्मचारी वर्ग चांगला असल्या तरी त्यांना सतत प्रोत्साहन देण्यासह त्यांच्या अडीअडचणी देखील नगरसेवक - अधिकारी यांनी समजून घेऊन सोडवल्या पाहिजेत. रुग्णालयात डासांचा त्रास आहे. बिछाने व चादरी नीट नाहीत, ब्लॅंकेट जुनी आहेत. ती स्वच्छ धुतले जात नाहीत. स्वच्छता काटेकोर ठेवली जात नाही. साधे पडदे लावून सुद्धा महिलांना कंपार्टमेंट नाही. प्रसूत महिलेसोबत असणाऱ्या व्यक्तीसाठी कुठलीच सुविधा नाही . 

तिसऱ्या मजल्याचे काम सुरू असल्याने पावसाचे पाणी थेट दुसऱ्या मजल्यावर व संपूर्ण रुग्णालयात साचते. दुसऱ्या मजल्यावर प्रसूती गृह असताना कित्येक महिन्यांपासून लिफ्ट बंद आहे. यामुळे तपासणी व प्रसूतीसाठी येणाऱ्या गरोदर महिलांना खूपच त्रास होतो. नगरसेवक आणि अधिकाऱ्यांचे सतत लक्ष हवे. पण दुर्दैवाने यासाठी फारसे गांभीर्य दाखवले जात नसल्याने गैरसोयी वाढतात असे तारा घरत म्हणाल्या.  

राजकारणी, नगरसेवक हे महापालिकेच्या रुग्णालय, दवाखान्यांकडे फिरकत नाहीत. ते स्वतः उपचारासाठी मोठ्या खाजगी रुग्णालयाला पसंती देतात. पालिका रुग्णालयात तर नगरसेवक, राजकारणी, अधिकारी आदी उपचारासाठी गेल्यास पालिका रुग्णालय व दवाखाने अजून चांगले होतील व चांगली सेवा लोकांना मिळेल. 

प्रसुतीसाठी कोणी नगरसेवक वा बड्या राजकारण्यांचे पालिका रुग्णालयात दाखल झाल्याचे गेल्या २० वर्षात तरी ऐकिवात नाही . या आधी देखील घरत व त्यांच्या कुटुंबियांना कोरोना झाला तेव्हा त्या महापालिकेच्या कोविड केअर मध्येच उपचारासाठी दाखल झाले होते. त्यामुळे तारा घरत व कुटुंबियांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. 

 

Web Title: corporators daughter in law delivered baby boy in municipal Hospital at bhayandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.