नगरसेवकांची खेळी: स्थानिक-प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांचा वाद उफाळला, स्थानिक अधिकाऱ्यांच्या पदाेन्नतीसाठी खटाटोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 12:25 AM2021-01-22T00:25:54+5:302021-01-22T00:28:52+5:30
प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना ठाण्याची माहितीच नसल्याचा आरोप करीत काही नगरसेवकांनी मर्जीतील स्थानिक अधिकाऱ्यांना पद्दोन्नती कशी मिळेल, यासाठी दमदार खेळी खेळण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, ज्यांची शैक्षणिक पात्रतादेखील नाही, अशा काही अधिकाऱ्यांना थेट पद्दोन्नती देण्याचा घाट यानिमित्ताने घातला गेला.
ठाणे: ठाणे महापालिकेत स्थानिक अधिकारी विरुद्ध प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये वेळोवेळी वाद होतात. बुधवारी महासभेत या वादाचे पडसाद पुन्हा उमटले. प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना ठाण्याची माहितीच नसल्याचा आरोप करीत काही नगरसेवकांनी मर्जीतील स्थानिक अधिकाऱ्यांना पद्दोन्नती कशी मिळेल, यासाठी दमदार खेळी खेळण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, ज्यांची शैक्षणिक पात्रतादेखील नाही, अशा काही अधिकाऱ्यांना थेट पद्दोन्नती देण्याचा घाट यानिमित्ताने घातला गेला.
राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या मुद्द्याला हात घातला. कित्येक वर्षे पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जात नाही. परंतु प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना येथे स्थान दिले जाते. जेवढी माहिती येथील अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना असते, तेवढी प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना नसते. कित्येक वर्षे ते त्याच पदावर कार्यरत असून पात्रता असतानाही त्यांना पदोन्नती किंवा पदांचे वाटप केले जात नाही. पद्दोन्नती दिल्यास त्यांचे मनोबल उंचावेल. त्यामुळे त्यांना बढती देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनीही पालिकेतील अशा साहाय्यक आयुक्त, उपायुक्त व इतर कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याची मागणी केली. आकृतीबंधाचा आधार घेत महत्त्वाच्या रिक्त पदांवर अशा अधिकाऱ्यांना बढती देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे सभागृह नेते अशोक वैती यांनी मुल्ला यांचे अनुमोदन केले. महापालिकेत एक अतिरिक्त आयुक्त हा शासनाचा आणि एक महापालिकेच्या सेवेतील असला पाहिजे, असे मत या वेळी नगरसेवकांनी व्यक्त केले. ठाणे महापालिकेत सध्या दोनही अतिरिक्त आयुक्त हे शासनाकडून आलेले आहेत. त्यामुळे नगरसेवकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे एकाची गच्छंती निश्चित मानली जात आहे. यापैकी एक अधिकारी शिवसेनेच्या कृपेमुळेच डेरेदाखल आहे. त्यामुळे त्याची गच्छंती होणे अशक्य आहे. त्यामुळे आता दुसऱ्याची गच्छंती व्हावी यासाठीच हा सगळा खटाटोप सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.
देशमुख म्हणाले, मीच ‘अतिरिक्त’ -
महापालिकेतील किती पदे रिक्त आहेत, शासनाकडून किती पदे भरली गेलेली आहेत, कितींना अद्याप पदाचे वाटप झालेले नाही आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांना, साहाय्यक आयुक्तांना पद्दोन्नती किंवा प्रभारीवरून कायम करण्यासाठी कसे प्रयत्न सुरू आहेत, याची माहिती अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी नगरसेवकांच्या मागणीनुसार दिली. अतिरिक्त आयुक्त पदाबाबत बोलताना, आता मीच येथे अतिरिक्त आहे, त्यामुळे तुम्ही म्हणाल तर उद्याच जातो, असे थेट प्रतिउत्तर देशमुख यांनी दिल्याने सभागृह आवाक् झाले.
स्थानिक अधिकाऱ्यांनी घातला घाट -
ठाणे महापालिकेत मागील कित्येक वर्षांपासून सेवा देणाऱ्या काही अधिकाऱ्यांना निश्चितच पदोन्नती देणे गरजेचे आहे. ते त्यासाठी पात्र आहेत. परंतु काहींची शैक्षणिक पात्रता नसतानादेखील किंवा ते साहाय्यक आयुक्त पदासाठीदेखील पात्र नसताना त्यांना साहाय्यक आयुक्त पदाचा प्रभारी कार्यभार देण्यात आला आहे. परंतु त्यांनादेखील साहाय्यक आयुक्तांचा कायमचा पदभार मिळावा यासाठी राजकीय मंडळींचा अट्टाहास आहे. नियमानुसार जे पदोन्नतीसाठी पात्र असतील त्यांना ते दिल्यास हरकत नाही. परंतु राजकीय मंडळींना हाताशी धरून काही स्थानिक अधिकाऱ्यांनीच आता हा घाट घातला असल्याचेही बोलले जात आहे.