नगरसेवकांचे केरळ पूरग्रस्तांना एक महिन्याचे मानधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 03:50 AM2018-08-21T03:50:55+5:302018-08-21T03:51:12+5:30
केरळ पूरग्रस्तांसाठी पक्षाच्या नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय शिवसेनेने घेताच, इतर पक्षांच्या नगरसेवकांनीही मानधन देण्याचे घोषित केले.
उल्हासनगर : केरळ पूरग्रस्तांसाठी पक्षाच्या नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय शिवसेनेने घेताच, इतर पक्षांच्या नगरसेवकांनीही मानधन देण्याचे घोषित केले. आमदार ज्योती कलानी यांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन देण्याचे जाहीर केले असून महापालिकाही आर्थिक मदत करणार असल्याचे संकेत आयुक्तांनी दिले.
शहरातील सामाजिक संस्था, व्यापारी आदींनी केरळातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. त्यापाठोपाठ शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे व पक्षाचे गटनेते रमेश चव्हाण यांनी पक्षाच्या २५ नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन केरळ पूरग्रस्तांना देण्याचे दोन दिवसांपूर्वी जाहीर केले. सोमवारी महासभा सुरू होताच, दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहून महासभा स्थगित करण्यात आली. यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. त्यापूर्वी सर्वच पक्षांच्या गटनेत्यांनी केरळ पूरग्रस्तांना एका महिन्याचे मानधन देण्याचे पत्र पालिका सचिवाकडे दिले. महापालिकेकडून आर्थिक आणि इतर मदतही करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.
प्रल्हाद म्हात्रेंचे एक लाखाचे अर्थसाहाय्य
डोंबिवली : केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी डोंबिवलीतील युवा युथ फाउंडेशनने सुमारे तीन टन विविध साहित्य जमा केले. हे धान्य, साहित्य केरळपर्यंत पोहोचवण्यासाठी मनसेचे शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे यांनी एक लाख रुपये रोख रक्कम दिली. दरम्यान, सोमवारी हे साहित्य रवाना झाले असून ते मंगळवारी केरळमध्ये पोहोचणार आहे. केरळमधील पूरग्रस्तांना मदत म्हणून युवा युथ फाउंडेशनने जीवनावश्यक वस्तू व सामान देण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. फाउंडेशनने त्यासाठी ठाकुर्ली व डोंबिवली येथे दोन संकलन केंद्रे सुरू केली. नागरिकांनी शनिवार आणि रविवारी तेथे तीन टन सामान जमा केले. परंतु, ते केरळमध्ये पोहोचवण्यासाठी ९० हजार खर्च येणार होता. त्यासाठी निधी गोळा करण्याचा पेच युवकांसमोर होता. मात्र, म्हात्रे यांनी एक लाख रुपये देत फाउंडेशनला मदतीचा हात दिला. केरळची परिस्थिती कोणावरही येऊ शकते. त्यासाठी देशभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. त्यातच आपलाही खारीचा वाटा असावा, यासाठी सामाजिक बांधीलकी म्हणून अर्थसाहाय्य केल्याचे म्हात्रे म्हणाले.
भाजपातर्फे केरळला २५ लाखांची मदत
डोंबिवली : केरळमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून भाजपाच्या कल्याण जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कल्याण-डोंबिवलीतील नगरसेवकांनी पुढे यावे, असे आवाहन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. दरम्यान, चव्हाण यांनीही त्यांचे महिन्याचे दोन लाख १३ हजारांचे मानधन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिल्याचे जाहीर केले.सावरकर रोड येथील चव्हाण यांच्या जाणता राजा कार्यालयात शुक्रवारी केरळ समाजासमवेत बैठक झाली. कल्याण-डोंबिवलीतील भाजपाचे नगरसेवक आणि आपण दिलेला निधी, असे एकूण २५ लाखांचे अर्थसाहाय्य केरळसाठी दिले जाणार आहे. डोंबिवलीतील नागरिकांनीही ‘सेवा भारती केरलम’ यांना साहाय्य करावे, असे आवाहन यावेळी चव्हाण यांनी केले. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनीही त्यांचे महिन्याचे एक लाखाचे मानधन केरळ सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणार असल्याचे स्पष्ट केले.