अर्थसंकल्पाच्या सभेला गैरहजर राहणाऱ्या नगरसेवकांना प्रभाग सुधारणा निधी नाही, महापौरांचा विरोधकांना टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 02:33 PM2018-03-23T14:33:09+5:302018-03-23T14:33:09+5:30
विरोधकांनी जरी बजेटच्या महासभेबाबत आक्षेप घेतले असले तरी देखील ही महासभा लावली जाईल असे स्पष्ट मत महापौर मीनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केले आहे. परंतु जे नगरसेवक या सभेला गैरहजर राहतील त्यांना प्रभाग सुधारणा निधी दिला जाणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
ठाणे - नियमानुसार राष्ट्रगीत झाल्याने बजेटवरील महासभा संपली असल्याने यापुढे महासभा लावल्यास ती बेकायदेशीर ठरेल असा पावित्रा घेत लोकशाही आघाडीने या महासभेलाच गैरहजर राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु त्यांच्या वक्तव्याची हवा अवघ्या एका दिवसातच निघाली असून जो नगरसेवक बजेटच्या महासभेला गैरहजर राहिल त्याला प्रभाग सुधारणा निधी दिला जाणार असल्याचा पावित्रा आता महापौरांनी घेतला आहे. तसेच प्रशासन देखील ही महासभा लावण्यास अनुकुल झाल्याने विरोधकांची रस्त्यावर उतण्याची हवाच निघाली आहे.
ठाणे महानगर पालिका आयुक्तांनी १९ मार्च रोजी अंदाजपत्रक मांडले आहे. हे अंदाजपत्रक विनाचर्चा मंजूर झालेले असतानाही सत्ताधारी पक्षाकडून नव्याने महासभा बोलावण्याची तयारी सुरु झाली आहे. या पाशर््वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ३८ नगरसेवकांनी विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन अंदाजपत्रकाला पाठिंबा जाहीर केला असला तरी देखील त्या सभेमध्ये आयुक्तांच्या विश्लेषणानंतर राष्ट्रगीत घेण्यात आले. त्यामुळे ही सभा संपली असल्याचा मुद्दा उपस्थित करुन यापुढे जर महासभा लावली तर ती बेकायदेशीर ठरणार असून, त्या सभेला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट मत लोकशाही आघाडीने व्यक्त केले होते. तसेच नगरसेवकांच्या प्रभागामध्ये असलेल्या नागरी कामांच्यासाठी आयुक्तांनी निधी द्यावा, अशी मागणी देखील एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान विरोधकांनी घेतलेल्या भुमिकेची अवघ्या एकाच दिवसात महापौरांनी हवा काढली आहे. नियमानुसार बजेटची महासभा घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु या महासभेत जे नगरसेवक गैरहजर राहतील त्यांना प्रभाग सुधारणा निधी दिला जाणार नसल्याची स्पष्ट भुमिका देखील त्यांनी घेतली आहे. शिवाय विरोधकांनी केलेल्या सुचनांचा अंतर्भाव करायचा की नाही, याबाबतचाही निर्णय देखील मी घेईन असे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महासभेला हजर राहायचे की गैरहजर हा विचार विरोधकांनीच करावा असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. दुसरीकडे या बाबत प्रशासनाने देखील राष्ट्रगीत झाले म्हणजे महासभा संपली असा त्याचा अर्थ होत नसल्याचे स्पष्ट करीत मागील कित्येक वर्षापासून तसा पायंडा पडला आहे. त्यामुळे बजेटची महासभा घेता येऊ शकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय महासभा चालविण्यासाठी ३७ टक्के कोरम अपेक्षित असतो, तो कोरम होणार असल्याने बजेटची महासभा आता केव्हाही लावली जाऊ शकते असा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
सभा कायदेशीर असेल तर सहभागी होऊ... विरोधकांनी घेतली मवाळ भुमिका
चौकट - विरोधकांनी टोकाची भुमिका सोडली नाही तर त्यांच्याकडील विकास निधी देखील महासभेत चर्चेच्या अनुषांगाने आमच्या विभागात वळवू असा पावित्रा देखील सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे विरोधकांची तलवार आता जवळ जवळ म्यान झाली असून सभा कायदेशीर असेल तर आम्ही सहभागी होऊ अशी काहीशी भुमिका लोकशाही आघाडीने घेतल्याची माहिती आहे.