नगरसेवकांसाठी फक्त सोमवारी

By admin | Published: July 3, 2017 06:18 AM2017-07-03T06:18:55+5:302017-07-03T06:18:55+5:30

महापालिका कामकाजात शिस्त यावी यासाठी नगरसेवकांनी फक्त सोमवारी भेटावे, असा फतवा आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी

For corporators only on Monday | नगरसेवकांसाठी फक्त सोमवारी

नगरसेवकांसाठी फक्त सोमवारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिका कामकाजात शिस्त यावी यासाठी नगरसेवकांनी फक्त सोमवारी भेटावे, असा फतवा आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी काढला. नगरसेवक केव्हाही भेटायला येत असल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली होती. शहरहितासाठी हा निर्णय घेतला असून अत्यावश्यक व महत्वाचे काम असेल तर नगरसेवक केव्हाही भेटू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नगरसेवक केव्हाही आयुक्तांना भेटायला जात असल्याने महत्वाच्या बैठका आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला होता. तसेच नगरसेवकांनी सांगितलेल्या कामाची नोंद केली जात नसल्याने कामे रेंगाळली होती. महापालिका कामात शिस्त येण्यासाठी व विकासकामे लवकर होण्यासाठी निंबाळकर यांनी नगरसेवकांनी फक्त सोमवारी भेटावे असे पत्रक काढले आहे. तर नागरिकांनी विविध कामांसाठी संबंधित प्रभाग समिती अधिकाऱ्यांना सोमवारी भेटावे. त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्यास मंगळवारी दुपारी चार वाजता भेटण्याची वेळ त्यांच्यासाठी आयुक्तांनी राखून ठेवली आहे.
सोमवारी सकाळी अकरा वाजता सर्व विभागप्रमुखांची बैठक आयुक्त घेतात. बैठकीत शहरातील समस्य व कामांची माहिती दिली जाते. त्यानंतर नगरसेवक भेटले तर त्यांच्या समस्या ऐकून त्यांना उत्तर देता येऊ शकेल असे ते म्हणाले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना समस्या सांगून लवकर सोडवून घेता येणार आहे. आठवडयाच्या पहिल्याच दिवशी समस्या सोडवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यावर एका आठवडयात कामे मार्गी लागतील. या भावनेतूनच नगरसेवकांना सोमवारी भेटण्याचे परिपत्रक काढल्याची माहिती निंबाळकर यांनी दिली. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही निवडून आलो आहोत. त्या समस्या सोडवण्यासाठी आयुक्तांना भेटणे यात गैर काय. असा प्रश्न नगरसेवक करत आहेत.

शिवसेनेसह अन्य नगरसेवकांचा विरोध

आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांचा निर्णय म्हणजे नगरसेवकांच्या अधिकारावर गदा आणणारा आहे, असा आरोप शिवसेनेसह इतर पक्षाच्या नगरसेवकांनी केला आहे.
नगरसेवकांवर निर्बंध घातल्यास शहराचा विकास ठप्प पडेल अशी प्रतिक्रीया शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. उद्या शिवसेना पालिकेवर धडक मोर्चा काढणार असून मोर्चाद्वारे या विषयाला हात घालणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: For corporators only on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.