फेरीवाल्यांवर कारवाई करताना नगरसेवकांनी दबाव आणू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:47 AM2021-09-04T04:47:47+5:302021-09-04T04:47:47+5:30

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत काही नगरसेवकांनी फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याचा मुद्दा मांडत प्रशासनाला लक्ष्य केले. आयुक्तांनी भर ...

Corporators should not put pressure on peddlers | फेरीवाल्यांवर कारवाई करताना नगरसेवकांनी दबाव आणू नये

फेरीवाल्यांवर कारवाई करताना नगरसेवकांनी दबाव आणू नये

Next

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत काही नगरसेवकांनी फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याचा मुद्दा मांडत प्रशासनाला लक्ष्य केले. आयुक्तांनी भर महासभेत फेरीवाल्यांवर कारवाई करतेवेळी नगरसेवकांनी दबाव टाकू नये, असे खडे बोल सुनावून फेरीवाल्यांना संरक्षण देणाऱ्या नगरसेवकांची पोलखोल केली आहे. वादग्रस्त फेरीवाला सर्वेक्षण यादी प्रसिद्ध करू नये, असे महासभेने ठरवले.

‘लोकमत’ने याप्रकरणी मांडलेली परिस्थिती ठाणे पालिका महिला अधिकाऱ्यावर झालेला हल्ला व नागरिकांची नाराजी आदी कारणांनी गुरुवारच्या महासभेत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर तसेच सर्वेक्षण यादीवर वादळी चर्चा झडली. जुबेर इनामदार यांनी फेरीवाल्यांवर कारवाईसाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा, रस्ते मोकळे हवे असे म्हटले. नीलम ढवण, अमजद शेख यांनी सांगितले की, स्थानिक लोकच फेरीवाले हवेत. बाहेरचे फेरीवाले रद्द करा. ध्रुवकिशोर पाटील म्हणाले की, यादीतील फेरीवाल्यांना कॉल केला असता कोणी बँकेत तर कोणी अन्यत्र कामाला असल्याचे समजले. हेतल परमार यांनी आरोप केला की, चार वर्षे पत्र देऊनही फेरीवाले हटत नाहीत. महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनीही ‘वॉक विथ कमिश्नर’ उपक्रमात आयुक्त सकाळी ताफा घेऊन जातात तेव्हा कोणी फेरीवाला नसतो. ताफा गेला की फेरीवाले येतात असा टोला लगावला. यावेळी फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणाची यादी प्रसिद्ध करू नये. तसेच महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

यावेळी आयुक्त दिलीप ढोले यांनी फेरीवाल्यांवर पालिका कारवाई करते, तेव्हा नगरसेवकांनी कारवाई करू नका म्हणून विनंती वा दबाव आणू नये, असे महासभेत सांगून नगरसेवकांची पोलखोल केली. यातून नगरसेवक-फेरीवाल्यांचे साटेलोटे असल्याच्या आरोपांना बळ मिळाले आहे. फेरीवाले सर्वेक्षणासाठी मँगोज इंटरप्रायझेसचा ठराव ध्रुवकिशोर पाटील यांचा असल्याची आठवण आयुक्तांनी करून दिली. फेरीवाल्यांवरून प्रशासनाला बदनाम केले जाते. महापौर, नगरसेवक बदनाम होतात. कारवाई केली तरी बदनामी होते, असे नयानगरच्या एका हातगाडीवर केलेल्या कारवाईवरून आयुक्त म्हणाले.

आम्हीही माणसेच

अधिकारी-कर्मचारीही माणसेच आहेत. ही एकत्रित जबाबदारी आहे. सर्वांचे सहकार्य लागेल. फेरीवाल्यांना पदाधिकाऱ्यांनी बसवले किंवा प्रशासनाने कारवाई केले नाही असे सांगून प्रश्न सुटणार नाही. चौक-रस्त्यांवर कॅमेरे लावणार. मुख्य रस्ते फेरीवालामुक्त करणार, अशी ग्वाही आयुक्तांनी महासभेत दिली.

Web Title: Corporators should not put pressure on peddlers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.