लाचखोर तहसीलदार, शिपायाला पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:27 AM2021-09-02T05:27:11+5:302021-09-02T05:27:11+5:30
कल्याण : एका बांधकामाच्या प्रकरणात सुनावणी करताना निकाल देण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारणारे तहसीलदार दीपक आकडे ...
कल्याण : एका बांधकामाच्या प्रकरणात सुनावणी करताना निकाल देण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारणारे तहसीलदार दीपक आकडे आणि शिपाई बाबू ऊर्फ मनोहर हरड यांना मंगळवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
वरप गावातील बांधकामासंदर्भात कंपनीच्या बाजूने निकाल देण्यासाठी २६ ऑगस्टला झालेल्या सुनावणीदरम्यान आकडे यांनी स्वत:साठी १ लाख रुपये लाचेची मागणी करून ती रोकड कार्यालयीन शिपाई हरड याच्याकडे देण्यास सांगितले होते. तक्रारदाराने हरड याच्याशी चर्चा केली असता त्यानेही २० हजारांची मागणी केली होती. दरम्यान या दोघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे यांच्या पथकाने सोमवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास सापळा लावून रंगेहात अटक केली. रात्री उशिरापर्यंत तहसील कार्यालयातच दोघांची चौकशी सुरू होती. त्यानंतर महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात लाचप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात मंगळवारी दोघांना हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, यासंदर्भात शेवाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आरोपींना एक दिवसाची कोठडी मिळाली असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.
------------------------