कल्याणमध्ये मोफत रेशनिंग धान्य वाटपात भ्रष्टाचार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 12:00 PM2020-04-16T12:00:03+5:302020-04-16T12:00:34+5:30
भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांचा आरोप; घेतली रेशनिंग अधिका-यांची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात गोरगरिबांना मोफत २५ किलो धान्य वाटप करण्याचे रेशनिंग दुकानचालकांना केंद्र, राज्य शासनाचे आदेश दिले आहेत. मात्र त्या धान्य वाटपामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे. २५ किलो ऐवजी अनेकांना अवघे १० किलोच धान्य मिळाले असून जे सुरु आहे ते योग्य नाही असे सांगून त्यांनी कल्याणमधील शिधावाटप अधिकारी एकनाथ पवार यांची भेट घेतली.
पवार यांनी सांगितले की, मोफत धान्य वाटपात कमी धान्य मिळाल्याच्या असंख्य तक्रारी आल्या असून जे सुरु आहे ते योग्य नाही. तसेच जे नाममात्र दरामध्ये १० किलो अन्नधान्य मिळणार आहे त्यामध्येही अवघे ४ किलोच काहींना धान्य मिळाल्याच्या तक्रारी नरेंद्र पवार यांच्याकडे नागरिकांनी केल्या. त्यानूसार खातरजमा करण्यासाठी पवार यांनी बुधवारी कल्याणमधील काही रेशनिंग दुकानांना भेट दिली. तेथे त्यांनी लाभार्थ्यांशी चर्चा केली, त्यानूसार सगळा गोंधळ त्यांच्या नीदर्शनास आला. त्यामुळे त्यांनी थेट शिधावाटप अधिका-यांची भेट घेत घडला प्रकार त्यांच्या नीदर्शनास आणुन दिला. एकनाथ पवार यांनीही त्या तक्रारीची दखल घेत धान्य जे नियमानूसार आहे तसेच वितरीत व्हायला हवे, तसे नसेल होत तर मात्र संबंधितांवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
पवार म्हणाले की, अटाळी गावामध्ये एका नगरसेवकाच्या नातेवाईकालाही असाच अनुभव आल्याचे ते म्हणाले. त्यांच्या रेशनकार्डवरचे धान्य देण्यास नकार देण्यात आला, जेव्हा आवाज उठवला तेव्हा धान्य देण्यात आले, पण अशा पद्धतीने धान्य वाटपाचे केंद्राचे आदेश असतांनाही खालच्या स्तरावर त्याची अंमलबजावणी पारदर्शी व्हायलाच हवी अशी मागणी पवार यांनी केली. शिधावाटप अधिका-यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करावी, तसेच संबंधितांना याचा जाब विचारावा, नागरिकांशी चर्चा करावी, त्यांचे गा-हाणे, तक्रारी ऐकून त्या तातडीने सोडवाव्यात. तसेच जे कोणी भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न करत असतील अशांवर कडक कारवाई करावी अशीही मागणी पवार यांनी केली.
ज्या उर्वरीत नागरिकांकडे केशरी रेशन कार्ड आहे अशांना मोफत धान्याचा लाभ तातडीने सुरु करण्यात यावा. त्यासाठी तर त्यांना कोणी परत पाठवू नये. त्यावर एकनाथ पवार यांनी तातडीने १ मे पासून सगळया केशरी कार्ड वाल्या नागरिकांनाही धान्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
नरेंद्र पवार हे काही जणांच्या तक्रारी घेऊन आले होते, त्यासंदर्भात वरिष्ठांना कळवले आहे. तसेच धान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असून त्याचे वितरण जे पात्र लाभार्थी आहेत त्या सगळयांना देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. उर्वरीत केशरी कार्ड धारकांनाही १ मे पासून धान्य मिळण्याचे नियोजन सुरु आहे.
- एकनाथ पवार, शिधावाटप अधिकारी,कल्याण