टीएमटीच्या नव्या बसच्या ठेक्यांच्या दरात भ्रष्टाचार

By admin | Published: September 28, 2016 04:31 AM2016-09-28T04:31:46+5:302016-09-28T04:31:46+5:30

ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात नव्याने दाखल होत असलेल्या जेएनएनयूआरएम बसच्या संदर्भात संबंधीत ठेकेदाराला दिलेले दर हे नवी मुंबई महापालिकेने दिलेल्या दरापेक्षा कितीतरी

Corruption at the rate of TMT's new bus contract | टीएमटीच्या नव्या बसच्या ठेक्यांच्या दरात भ्रष्टाचार

टीएमटीच्या नव्या बसच्या ठेक्यांच्या दरात भ्रष्टाचार

Next

ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात नव्याने दाखल होत असलेल्या जेएनएनयूआरएम बसच्या संदर्भात संबंधीत ठेकेदाराला दिलेले दर हे नवी मुंबई महापालिकेने दिलेल्या दरापेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याचा मुद्दा उपस्थित करून मंगळवारी महासभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आक्रमक होऊन भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. यावर चर्चा करण्यासाठी वेळ मागूनही महापौरांनी ती न देता प्रकरण मंजूर करण्याची घाई केल्याने विरोधकांनी थेट त्यांनाच घेराव घातला. परंतु ,तरीदेखील सत्ताधाऱ्यांनी हा विषय रेटून नेला. त्यामुळे आता लोकशाही आघाडी या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी दिला. तसेच या प्रकरणाची लाल लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सखोल चौकशी करण्याची मागणीही यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केली. या संदर्भात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी भोईर यांनी हा इशारा दिला आहे.
जेएनएनयूआरएम अंतर्गत घेण्यात येणाऱ्या १९० बसच्या खरेदीत फेरबदला संदर्भातील वाढीव खर्चाचा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी आला असता विरोधकांनी शुक्रवारी झालेल्या सभेत कडाडून विरोध केला होता. परंतु, वेळे अभावी ही सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी दुपारी महासभा सुरु होताच, नजीब मुल्ला यांनी या मुद्याला हात घातला. परिवहन व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी या संदर्भात खुलाशास सुरवात केली. यामध्ये, परिवहन सेवेत नवीन बस घेतांना त्या संदर्भात सुरवातीला निविदा काढून तिला प्रतिसाद न मिळाल्याने तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. परंतु, तरीही प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा त्यातील अटी आणि शर्तीमध्ये बदल करुन नव्याने निविदा काढून त्यांनाही दोनवेळा मुदतवाढ दिली. त्यानंतर, दोन ठेकेदारांनी त्या भरल्या. त्या उघडल्यानंतर, ४०० एमएमच्या सेमी लोअरफ्लोअर बससाठी ६६ रुपये आणि ९०० एमएम मिडी बससाठी ५३ रुपये असा दर अंतिम करून त्याला मंजुरी देण्यात आली. तसेच नवी मुंबईने एप्रिल २०१६ मध्ये अशा स्वरुपाचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्या आधीच आपला प्रस्ताव मंजूर झाला होता. तसेच स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया घेऊनच हा ठेका दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, त्यांचा खुलासा झाल्यानंतर महापौर संजय मोरे यांनी विषय पत्रिका घेण्यास सुरवात केली. त्याच वेळेस पुन्हा मुल्ला यांनी या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून यावर चर्चा झालीच पाहिजे, अशी मागणी केली. परंतु, महापौरांनी त्यांची मागणी फेटाळल्याने विरोधकांनी डायसवर जाऊन त्यांना घेराव घातला. त्यानंतर पाच मिनिटे परवानगी देण्यात आली. परंतु, सत्ताधारी गटातील नगरसेवकांनीही यावर आम्हालादेखील बोलण्याची संधी द्यावी, अशी मागणी केल्याने महापौरांनी या विषयाला बगल देऊन महासभाच आटोपती घेतली. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी महापौरांना सभागृहा बाहेर जाण्यास मज्जाव केला. (प्रतिनिधी)

या सर्व प्रकरणाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी याबाबत उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा दिला. तर नजीब मुल्ला यांनी नवी मुंबई आणि ठाणे परिवहनने दिलेल्या दरात कशा पद्धतीने तफावत आहे, याचे पुरावे सादर करुन या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशीची मागणी करणार असल्याचे सांगितले.

Web Title: Corruption at the rate of TMT's new bus contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.