पालिका निवडणुकीत गैरप्रकार रोखणार ‘कॉप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 02:58 AM2017-07-19T02:58:18+5:302017-07-19T02:58:18+5:30
मीरा-भार्इंदर पालिका निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी, प्रलोभने दाखवली जात असतील तर ती रोखण्यासाठी आणि आणि आचारसंहितेचे उल्लंघन
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा-भार्इंदर पालिका निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी, प्रलोभने दाखवली जात असतील तर ती रोखण्यासाठी आणि आणि आचारसंहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी निवडणूक आयोग ‘सिटीझन आॅन पेट्रोल’ या अॅपचा वापर करणार आहे. प्रत्येक प्रभाग समितीत दर दोन किमीच्या परिसरासाठी तीन जागरुक नागरिकांची टीम तयार केली जात आहे. त्यामुळे आमिषे दाखवणाऱ्यांवर त्वरित कारवाई करता येईल.
राज्य निवडणूक आयोगाने सिटिझन आॅन पेट्रोल अर्थात ‘कॉप’ नावाच्या मोबाईल अॅपचा वापर सुरू केला आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) यांनी मोबाईल अॅप तयार केले आहे. निवडणूक प्रचारातील गैरप्रकारांना आळा घालणे हा या मागचा उद्देश आहे.
निवडणुकांमध्ये सर्रास पैसे, भेटवस्तू, गिफ्ट कूपन, मद्य वाटप, पार्ट्या आदी गैरप्रकार चालतात. शिवाय मतदारांना भुलवणाऱ्या जाहिराती-घोषणा केल्या जातात. बेकायदा बॅनर, होर्डिंग, फलक, पोस्टर लावले जातात. उमेदवार व राजकीय पक्षांकडून आपल्या प्रचारासाठी, विरोधकांविरुध्द सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. प्रार्थनास्थळे, लहान मुले-प्राण्यांचा प्रचारात वापर करण्यास मनाई असते. तो बंदीही अनेकदा धुडकावली जाते. ध्वनिक्षेपकांचा गैरवापर होतो. मतदानादिवशी मतदारांना केंद्रापर्यंत ने-आण करण्यास वाहने पुरवली जातात. याबद्दल तक्रारी होतात. पण पुरावे नसतात. पण आता कोणताही नागरिक या गैरप्रकारांचे फोटो काढून उमेदवार, पक्षाचा तपशील देत त्याची तक्रार करू शकणार आहे. यात साधारण २० प्रकारच्या गैरप्रकारांबद्दल तक्रार करता येणार आहे.
आचारसंहिता लागू होताच या ‘कॉप अॅप’साठी जनजागृती सुरू झाली आहे. पालिकेच्या सहाही प्रभाग समितीत प्रत्येकी दोन किमी अंतरावर तीन जागरुक नागरिकांचे पथक तयार करण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. कोणताही आचारसंहिता भंग, गैरप्रकार त्यांना दिसल्यास फोटोसह ते तक्रार करू शकतील आणि प्रभाग अधिकारी, आचारसंहिता पथकप्रमुखांसह वेगवेगळ््या अधिकाऱ्यांना फोन करून सांगू शकतील. तक्रारदाराचे नाव गोपनीय राहिल असे अधिकारी सांगत असले, तरी पालिकेतून ते नाव फुटल्यास जीवाला धोका निर्माण होण्याची भीती आहे, असे मत या जागरूक नागरिकांनी मांडले आहे.
फोटो काढा, तक्रार करा
प्रभागातील उमेदवार आणि राजकारण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी जागरूक नागरिकांवर सोपवायची आणि त्यांना कोणताही गैरप्रकार आढळल्यास त्याचे छायाचित्र काढून ते थेट ‘अॅप’वरून तक्रार करु शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.