कल्याण पूर्वेतील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:17 AM2018-07-26T00:17:27+5:302018-07-26T00:17:33+5:30
मनसेचे बेमुदत उपोषण; कामे अर्धवट असतानाही केडीएमसीकडून कंत्राटदारांना बिले अदा
कल्याण : पूर्वेकडील आमराई आणि तिसगाव गावठाण या दोन प्रभागांतील रस्त्यांची कामे अर्धवट असतानाही त्यांची बिले कंत्राटदारांना अदा केल्याच्या निषेधार्थ मनसेने केडीएमसीच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयाच्या परिसरात बुधवारपासून बेमुदत उपोषण छेडले आहे. त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेने केला असून चुकीच्या पद्धतीने बिले अदा करणाऱ्या अधिकाºयांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक १००- तिसगाव गावठाणमधील १०० फुटी रस्त्याच्या कामाला मार्च २००९ मध्ये मंजुरी मिळाली होती. परंतु, अजूनही हे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. मात्र, संबंधित कंत्राटदाराला मोठ्या प्रमाणावर बिल अदा केल्याकडे मनसेने लक्ष वेधले आहे. तर, प्रभाग क्रमांक ९९ आमराईमधील १८ मीटर रस्त्याच्या कामाला मार्च २०१४ मध्ये मंजुरी मिळाली आहे. हे कामही अर्धवट असताना बिलाची रक्कम अदा केल्याचे मनसेचे म्हणणे आहे. २६ जूनला यासंदर्भात पत्र देऊन या दोन्ही रस्त्यांच्या कामांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याचबरोबर काम पूर्ण होण्यास दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेने दिला होता.
दरम्यान, कोणतीही कार्यवाही न झाल्याने मनसेचे माजी नगरसेवक अनंता गायकवाड, उपशहराध्यक्ष योगेश गव्हाणे, विभाग अध्यक्ष विनीत भोई, देवेंद्र पिंगळे, उपविभागीय अध्यक्ष मनीष यादव, योगेश लमखडे, शांताराम गुळवे आदी पदाधिकारी ‘ड’ प्रभाग कार्यालयाच्या परिसरात बुधवारपासून बेमुदत उपोषणास बसले आहेत.
कामे पूर्ण नसताना जी बिले अदा केली आहेत, त्याबाबत कंत्राटदारांची अनामत रक्कम जप्त करावी, त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करावे, रस्त्याच्या कामात बाधित होणाºयांचे योग्य त्याठिकाणी पुनर्वसन व्हावे, आदी मागण्याही महिनाभरापूर्वी करण्यात आल्या होत्या.