कर्करोग निदानाचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर - डॉ. अनिल हेरूर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 04:02 AM2019-02-03T04:02:32+5:302019-02-03T04:04:15+5:30
दिवस सुरू झाला की, प्रत्येकालाच घड्याळाच्या काट्यावर धावावे लागते. प्रवासातील दगदग, खाण्यापिण्याची हेळसांड ही दिनचर्या बनली असून आरोग्याकडे लक्ष देण्यास कुणाकडेच वेळ नाही.
- मुरलीधर भवार
कल्याण - दिवस सुरू झाला की, प्रत्येकालाच घड्याळाच्या काट्यावर धावावे लागते. प्रवासातील दगदग, खाण्यापिण्याची हेळसांड ही दिनचर्या बनली असून आरोग्याकडे लक्ष देण्यास कुणाकडेच वेळ नाही. धकाधकीच्या या आयुष्यात अनेक गंभीर आजारांना आपण जवळ करत आहोत. काही वर्षांपूर्वी क्वचित आढळणाऱ्या कर्करुग्णांची संख्या वाढत आहे. देशात आजघडीला जवळपास १२ लाख कर्करुग्ण आहेत. कर्करोग निदानपद्धती प्रगत झाली असली, तरी ती सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नाही. त्यामुळे हा खर्च आवाक्यात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत कर्करोगसर्जन डॉ. अनिल हेरूर यांनी व्यक्त केले.
जागतिक कर्करोग दिन सोमवारी असून त्या पार्श्वभूमीवर डॉ. हेरूर यांनी सांगितले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. याठिकाणी केवळ टाटा कर्करोग रुग्णालय आहे. कर्करोगावर तीन प्रकारे उपचार होतात. शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि केमोथेरपी हे उपचार आहेत. टाटा कर्करोग रुग्णालयात रेडिएशनसाठी केवळ चार मशीन आहेत. या रुग्णालयात वर्षाला ३२ ते ४० हजार कर्करुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे रुग्णालयातील यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. तसेच कर्करोगग्रस्तांना रेडिएशन घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यांचा नंबर यावा लागतो. मुंबई उपनगरांचा विचार केला, तर मुंबईपासून जवळ असलेल्या ठाणे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांत रेडिएशन उपचारासाठी एकही यंत्र नाही. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात एक तरी रेडिएशन मशीन सरकारच्या आरोग्य विभागाने पुरवली पाहिजे. त्यामुळे कर्करुग्णांना टाटा रुग्णालयात धाव घ्यावी लागणार नाही, असे डॉ. हेरूर म्हणाले.
सरकारला ते शक्य नसल्यास आरोग्य क्षेत्रातील सेवाभावी सामाजिक संस्थांच्या मदतीने अशी मशीन खरेदी करावी. अन्यथा, सीएसआर फंडातून कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री खरेदी करून कर्करुग्णांना दिलासा द्यावा, अशी सूचनाही डॉ. हेरूर यांनी केली आहे.
हेरूर म्हणाले की, बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोग हा कोणालाही होऊ शकतो. शहरी व ग्रामीण भागातही रुग्ण आढळून येतात. महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण, तर पुरुषांमध्ये तोंड आणि फुफफुसाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. संपूर्ण भारताचा विचार केल्यास गर्भाशयाचा कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आहे. वर्षाला दोन लाख ५० हजार कर्करुग्ण आढळून येत असून १५ टक्क्यांनी वाढले आहेत. कर्करोगाचे निदान वेळीच झाले, तर ९० टक्के कर्करुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्य होऊ शकते, असे डॉ. हेरूर यांनी सांगितले.
व्यसन न केल्यास कर्करोग टाळणे शक्य !
मद्य, तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्याने तोंड आणि आतड्याचा कर्करोग होतो. व्यसने टाळल्यास कर्करोग टाळता येऊ शकतो. अतिलठ्ठपणामुळे महिलांना स्तनांचा, तर पुरुषांना आतड्याचा कर्करोग होतो.
अन्नभेसळीमुळे पित्ताशय, आतड्याचा कर्करोग होऊ शकतो. कर्करोग रोखण्यासाठी जनजागृती केली पाहिजे.
त्याची लक्षणे समजावून सांगितली पाहिजेत. त्याचा योग्य प्रचार-प्रसार झाल्यास कर्करोगावर मात करणे शक्य आहे, असे मत डॉ. हेरूर यांनी व्यक्त केले.