शीळफाटा उड्डाणपुलांचा खर्च सव्वाशे कोटींनी वाढला; दोन उड्डाणपुलांसह भुयारीमार्ग बांधणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 02:43 AM2020-08-25T02:43:09+5:302020-08-25T02:43:20+5:30
प्रकल्पाचा एकूण खर्च ४१० कोटींवर
नारायण जाधव
ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील अत्यंत गजबजलेल्या जंक्शनपैकी एक असलेल्या शीळ-कल्याणफाटा येथील प्रस्तावित दोन उड्डाणपूल आणि भुयारीमार्गाच्या खर्चात तब्बल सव्वाशे कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
या परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे या प्रकल्पाच्या आराखड्यात बदल करावा लागल्याने हे काम लांबणीवर पडलेले असतानाच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे त्यात पुन्हा बदल करावा लागला. या उच्चदाब वीजवाहिन्याही हटवाव्या लागणार आहेत. यामुळे या प्रकल्पांचा पूर्वीच्या सुधारित २८६ कोटींचा खर्च आता ४१० कोटी एक लाख ९४ हजारांवर गेला आहे. या वाढीव खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यताही एमएमआरडीएने नुकतीच दिली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -४ वरील शीळफाटा, कल्याणफाटा, महापे जंक्शन तसेच कल्याण-बदलापूर पाइपलाइन रोड या परिसरातील वाहतुकीत अलीकडच्या काळात मोठी वाढ झाली आहे. त्यातच, जेएनपीटी बंदरातून मुंबई-अहमदाबाद, नाशिक कडे जाणारी कंटेनरची अवजड वाहतूक या परिसरातून येजा करते. गेल्या काही वर्षांत ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह पनवेल या महानगरांचा विस्तार झपाट्याने झाला आहे.
या परिसरात काही खासगी विकासकांच्या टाउनशिपही येऊ घातल्या आहेत. यामुळे शीळफाटा परिसरात उड्डाणपूल बांधण्याचे एमएमआरडीएने प्रस्तावित केले होते. त्यासाठी स्टुप कन्सल्टंट यांच्याकडून सविस्तर अहवाल तयार केला होता. या अहवालात सध्याच्या ३० मीटर रुंदीच्या रस्त्याचे ६० मीटर रुंदीकरण करणे, शीळफाटा आणि कल्याणफाटा येथे उड्डाणपूल प्रस्तावित केले होते. त्यासाठी २८६ कोटींच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यताही एमएमआरडीएने दिली होती. त्यानंतर, कामास सुरुवात करून आॅगस्ट २०२० पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानुसार, ठेकेदारास एमएमआरडीएने ६६ कोटी ५९ रुपये अदाही केले आहेत. गेल्या काही वर्षांत ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह पनवेल या महानगरांचा विस्तार झपाट्याने झाला आहे.
असा होणार खर्च
अशातच बुलेट ट्रेनचा प्रकल्प आला. ही बुलेट ट्रेन दत्त मंदिराच्या जवळून पहिल्या स्तरावरून जमिनीखालून जात आहे. यामुळे हा आराखडा पुन्हा बदलण्याचे ठरले. त्यानुसार, नव्या आराखड्यानुसार आता १०५ कोटी ४३ लाख खर्चून या परिसरातील उच्चदाब वीजवाहिन्या आणि ३.५ किमी लांबीची एमआयडीसीची पाइपलाइन स्थलांतरित करावी लागणार आहे. याशिवाय, ४९ कोटी खर्चून शीळफाटा येथे ३+३ मार्गिकांचा उड्डाणपूल बांधणे, ९८.७८ कोटींचा कल्याणफाटा येथे २+२ मार्गिकांचा उड्डाणपूल बांधणे तसेच ५८.६६ कोटींचा कल्याणफाटा जंक्शन येथे ३+३ मार्गिकांचा भुयारीमार्ग बांधण्याचे प्रस्तावित केल्यामुळे हा खर्च वाढला आहे.