महामार्गावर वेग वाढविल्याची किंमत दोन कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:48 AM2021-09-08T04:48:53+5:302021-09-08T04:48:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातून जाणारा मुंबई-नाशिक पूर्व द्रूतगती राष्ट्रीय महामार्ग तसेच मुंबई-अहमदाबाद या महामार्गांवरून अति वेगाने वाहने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातून जाणारा मुंबई-नाशिक पूर्व द्रूतगती राष्ट्रीय महामार्ग तसेच मुंबई-अहमदाबाद या महामार्गांवरून अति वेगाने वाहने चालविणाऱ्या तब्बल २० हजार ७९८ चालकांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या विविध पथकांनी गेल्या आठ महिन्यांत कारवाई केली. त्यांच्यावर दोन कोटी सात लाख ९८ हजारांची दंडात्मक कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केंद्रीय रस्ते वाहतूक नियमावलीनुसार द्रुतगती मार्गावर वाहनांचा वेग हा ताशी ८० ते १२० किलो मीटर इतका मर्यादित असणे अपेक्षित आहे. चार मार्गिकांवर तो ताशी ५० ते १०० तर महापालिका क्षेत्रातून जाणाऱ्या महामार्गावर तो ताशी ५० ते ७० असा आहे. यात दुचाकी ताशी ८० किमी, रिक्षांसाठी ६० तर प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी तो ८० ते १२० इतका आहे. तरीही वेगाने वाहन चालविल्याबद्दल कलम ११२ तसेच १८३ नुसार दंडात्मक कारवाई केली जाते.
* ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील महामार्गावर जानेवारी ते ऑगस्ट २०२१ या सात महिन्यांच्या काळात बेदरकार वाहने चालविणाऱ्या २० हजार ७९८ चालकांवर कारवाई झाली. त्यातील तीन हजार ३२७ चालकांनी ३२ लाख २७ हजारांचा दंड भरला असून १७ हजार ४७१ चालकांकडून एक कोटी ७४ लाख ७१ हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे.
* महामार्गावर कोणत्या महिन्यात किती दंड
महिना २०२१ दंड
जानेवारी -३६,२८०००
फेब्रुवारी-२१,२३०००
मार्च-२६,१२०००
एप्रिल-१८,८२०००
मे-३२,४८०००
जून-२६,५३०००
जुलै-२६,२१०००
ऑगस्ट-२०,३१०००
* धावत्या गाडीचा मोजला जातो वेग-
वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाईसाठी इंटरसेप्टर एक आणि दोन अशा दोन वाहनांची नेमणूक केलेली आहे.
* एसएमएसवर मिळते पावती -
वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई केल्यानंतर तत्काळ त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे दंडाची माहिती दिली जाते, अशी माहिती पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.
.........................