नगरसेवकांचा निधी गरीबांसाठी खर्च करावा - जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 05:03 PM2020-04-21T17:03:49+5:302020-04-21T17:07:21+5:30
कोरोनामध्ये लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब नागरीकांना मदत मिळावी या उद्देशाने जाग या संस्थेच्या वतीने महापौरांना पत्र दिले असून नगरसेवकांचा नगरसेवक निधी या नागरीकांसाठी खर्ची करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
ठाणे : कोरोनाच्या संसर्गाने संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. लॉक डाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होत आहे. ठाणे, मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर भागांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रु ग्ण आढळून आल्याने राज्याला मोठ्या आर्थिक निधीची गरज आहे. त्यामुळे ठाणे महानगर पालिकेतील सर्व नगरसेवकांचा निधी पालिकेकडे वर्ग करावा आणि त्यामधून गरजू गरीब लोकांसाठी जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करावा अशी मागणी जाग संस्थेने केली आहे.
गोरगरीब कामगार वर्गाकडे सध्या कोणतीही कमाई नसल्याने तो वर्ग हवालिदल झालेला आहे. बहुतेक गरिबांकडे असलेले अन्नधान्य, पैसे संपले आहेत. त्यामुळे त्यांना दोन वेळचे जेवण देखील मिळेनासे झाले आहे. काही प्रमाणात सामाजिक संस्थांकडून गरिबांना जेवण पुरविले जाते आहे. परंतु त्यांच्याकडे आता आर्थिक टंचाई निर्माण होऊ लागली असल्याने पुढील काही दिवसांत गरीबांच्या उपासमारीमध्ये मोठी वाढ होणार आहे. राज्यात कोरोनाची आणीबाणी निर्माण झाल्याने राज्याला जास्त निधीची गरज आहे. राज्यातून रोजगारासाठी स्थलांतरित झालेला मोठा मजूर वर्ग ठाण्यात आहे. त्यांनाही मदतीची गरज आहे. त्यामुळे किमान ठाणे महानगर पालिकेने तरी सगळ्याच मदतीसाठी राज्यावर अवलंबून न राहता इथल्या गरीब, गरजूंना अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा करण्यासाठी सर्व नगरसेवकांचा विकास निधी ठाणे महापालिका प्रशासनाकडे वर्ग करावा.
अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेता ठाणे महापालिकेच्या सर्व नगरसेवकांचा प्रत्येकी १० लाख रु पयांचा नगरसेवकनिधी महापालिकेस वर्ग करावा. ठाणे महानगर पालिकेत १३० नगरसेवकांची संख्या आहे. त्यासाठी लागणारी स्थायी समितीची मंजुरी घेऊन तसा ठराव राज्यशासनाकडे त्वरीत मंजुरीसाठी पाठवावा अशी मागणी जाग संस्थेचे संजय मंगो, जगदीश खैरालिया, वंदना शिंदे, प्रदीप इंदुलकर, मिलिंद गायकवाड, अजय भोसले यांनी महापौर नरेश म्हस्के, पालिका आयुक्त आणि पालकमत्र्यांकडे केली आहे.