मतांसाठी नगरसेवकांचीही फिल्डिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 02:19 AM2019-04-23T02:19:21+5:302019-04-23T02:19:53+5:30

केडीएमसी, उल्हासनगर, अंबरनाथ पालिका; बैठका, पदयात्रांसह व्यक्तिगत भेटीगाठींवर भर

Councilors fielding for votes! | मतांसाठी नगरसेवकांचीही फिल्डिंग!

मतांसाठी नगरसेवकांचीही फिल्डिंग!

Next

- प्रशांत माने 

कल्याण : लोकसभा निवडणुकीतील कल्याण मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. उमेदवार स्वत: मेळावे आणि रॅली काढण्यावर भर देत असताना नगरसेवकांची फळीही जोमाने कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. बैठका, प्रभागांतील पदयात्रांसह व्यक्तिगत भेटीगाठींवर नगरसेवकांकडून भर दिला जात आहे.

केडीएमसीच्या २०१५ च्या निवडणुकीत शिवसेनेचे ५३, भाजपचे ४३, काँग्रेसचे ४, राष्ट्रवादी २, मनसे १०, बसपा १, एमआयएम १ असे राजकीय पक्षांचे नगरसेवक निवडून आले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या केडीएमसीतील शिवसेनेचे डोंबिवलीत १२, तर ग्रामीण आणि कल्याण पूर्व भागात एकूण १७ नगरसेवक आहेत. भाजपचे डोंबिवलीत १९ नगरसेवक आहेत. तर, कल्याण ग्रामीण आणि पूर्व मिळून १८ नगरसेवक आहेत. काँग्रेसचे चार नगरसेवक आहे. तर, राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक लोकसभा क्षेत्रातील डोंबिवली, कल्याण पूर्व-ग्रामीण या भागांत नाही. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिममध्ये दोन नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. मनसेने अप्रत्यक्षपणे का होईना, भाजपला विरोध म्हणून राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. मनसेचे येथे सहा नगरसेवक आहेत. त्याचबरोबर उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथ नगरपालिकेतील नगरसेवकही आपापल्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहेत.

युतीची स्थिती?
शिवसेना आणि भाजपकडे नगरसेवकांची भक्कम फळी आहे. प्रभागातील मतदारांचा संपर्क ठेवण्याबरोबरच बैठका, पदयात्रांवर भर देण्याच्या सूचना नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने सेनेचे सर्वच नगरसेवक कामाला लागले आहेत. सेनेच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी भाजपचे नगरसेवकही प्रभागांमध्ये प्रचारात उतरल्याचे दिसत आहे.

आघाडीची स्थिती?
आघाडीकडे नगरसेवकांचे फारसे बळ नाही. पण, राष्ट्रवादीचे कल्याण पश्चिम या भिवंडी लोकसभेतील केडीएमसीतील दोन नगरसेवक प्रचारात उतरले आहेत. काँग्रेसचे चार नगरसेवक राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ गाठीभेटी घेत आहेत. राष्ट्रवादीला मनसेची साथ लाभली असली, तरी प्रत्यक्षपणे प्रचार रॅली आणि सभांमध्ये उपस्थिती न लावता बैठका घेऊन भाजपविरोधी प्रचार करण्यावर मनसेचा कल आहे.

Web Title: Councilors fielding for votes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.