विचारेंसमोर नगरसेवकांनी वाचला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:15 AM2019-06-14T00:15:19+5:302019-06-14T00:15:22+5:30

भार्इंदर पालिका : आयुक्तांसोबत केली चर्चा, कामे करण्याची केली सूचना, शिवसेनेमध्ये समाधान

Councilors have read the issues before the crisis | विचारेंसमोर नगरसेवकांनी वाचला समस्यांचा पाढा

विचारेंसमोर नगरसेवकांनी वाचला समस्यांचा पाढा

Next

मीरा रोड : मागील खासदारकीच्या कार्यकाळात महापालिकेतील विषयांबाबत काहीसे अलिप्त राहणारे खासदार राजन विचारे यांनी बुुधवारी पालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांची बैठक घेत शहरातील विविध समस्यांबाबत चर्चा केली. इतकेच नव्हे तर शिवसेना नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या प्रलंबित तक्रारी, कामे आदीचा आढावा घेत प्रशासनाला कामे करण्याची समजही दिली. यापुढे नियमितपणे आयुक्तांसोबत बैठक घेऊन नागरिकांच्या तक्रारी, समस्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे विचारे यांनी स्पष्ट केले.

विचारे यांनी आयुक्त बालाजी खतगावकर यांच्यासह पालिका अधिकाºयांसोबत दोन तास बैठक घेतली. या वेळी नगरसेवक व पदाधिकाºयांनी त्यांच्या प्रलंबित तक्रारी, कामे आदी खासदारांसमोरच आयुक्तांना बोलून दाखवली. निवडणुकीचे कारण पुरे झाले, आता कामे करा असे विचारेंनी प्रशासनास बजावले. उत्तन येथील डम्पिंग ग्राऊंडमुळे ग्रामस्थ त्रस्त असून पावसाळ्यात आणखीनच त्रास होणार आहे. ग्रामस्थांनी अजून किती त्रास सहन करायचा असा सवाल त्यांनी केला. आयुक्तांनी शहरात सहा ठिकाणी नवीन कचरा प्रकल्पाचे काम सुरू करणार असून उत्तन येथे साचलेल्या कचºयावर प्रक्रिया करणार आहोत असे आश्वस्त केले. लिचेटसाठी व्यवस्था करू असे ते म्हणाले. धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर असून पालिकेला मिळालेल्या सदनिका या आपत्कालिन स्थिती उद्भवल्यास संक्रमण शिबिर म्हणून राखीव ठेवा, असे आयुक्तांना सांगितले. भार्इंदर व मीरा रोड स्थानक परिसरातील नागरिकांना अडथळा ठरणाºया फेरीवाल्यांवर ठोस कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

नगरसेवक एलायस बांड्या यांनी उत्तन येथील हिंदू स्मशानभूमीत वीज, सुरक्षारक्षक आदी सुविधा नसल्याचे सांगत तेथे मद्यपान आदी चालत असल्याचे निदर्शनास आणले. माजी नगरसेवक जॉर्जी गोविंद यांनी चौक येथील चिमाजी अप्पा स्मारक अजून रखडल्याचे सांगितले.
नगरसेविका शर्मिला गंडोली यांनी नवी खाडी, उपजिल्हाप्रमुख संदीप पाटील तर विकास पाटील यांनी नवघर खाडी मधील भराव - बांधकामे काढून तिवरांचा अडथळा दूर करण्याची मागणी केली. आयुक्तांनी खाड्यांचे रूंदीकरण व सफाईसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणार असल्याचे आश्वासन दिले. साई पुष्पम ही धोकादायक इमारत तोडण्यासाठी पालिकेने १५ लाखांची मागणी केल्याचे सांगत नगरसेवक दिनेश नलावडे यांनी खळबळ उडवून दिली.

प्रभाग अधिकारी संजय दोंदे यांनी काम थांबवल्याचे ते म्हणाले. पालिकेच्या प्रमोद महाजन हॉल व ठाकरे हॉल चालक कंत्राटदारांकडून मोनोपोली लादली जात असून नागरिकांकडून बळजबरी वसुली केली जात असल्याचा मुद्दा मांडण्यात आला.
नगरसेवक कमलेश भोईर यांनी तर दबावाखाली काम करू नका असे आयुक्त आणि अधिकाºयांना सुनावले. काशी गावातील मंडई होऊनही त्यात फेरीवाल्यांना स्थलांतरीत केले नाही. प्लेझेंट पार्क येथील व्यायामशाळेच्या आरक्षणात मार्केटचा घाट घालत काही भागात शेड असूनही कारवाई होत नसल्याचे ते म्हणाले.

अग्निशमन केंद्रात चक्क शॉपिंग सेंटर
उपजिल्हासंघटक शुभांगी कोटियन यांनी भार्इंदर अग्निशमन केंद्रात पालिकेने चक्क हॉल, शॉपिंग सेंटरचे बांधकाम करण्याचा घाट घातल्याबद्दल रहिवाशांचा विरोध असल्याचे आयुक्तांना सांगितले. हॉल आदी झाल्यास अग्निशमन दलाच्या वाहनांना अडथळा होणार असल्याने ते रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली. संतोष गुप्ता यांनी खारीगावातील मासळी मार्केट सुरू न केल्याबद्दल संताप व्यक्त केला.

Web Title: Councilors have read the issues before the crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.