पोलिसांच्या पाळतीवर नगरसेवकांचा आक्षेप
By admin | Published: November 2, 2015 02:53 AM2015-11-02T02:53:08+5:302015-11-02T02:53:08+5:30
बिल्डर सूरज परमार प्रकरणात चार नगरसेवकांच्या चुकीमुळे पोलिसांनी सरसकट सर्वच नगरसेवकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे,
अजित मांडके, ठाणे
बिल्डर सूरज परमार प्रकरणात चार नगरसेवकांच्या चुकीमुळे पोलिसांनी सरसकट सर्वच नगरसेवकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे, अशी भावना नगरसेवकांच्या वर्तुळात निर्माण होत आहे. चौकशीकरिता स्थायी समिती व महासभेचे इतिवृत्त पोलिसांनी मागणे आणि महापालिका आयुक्तांनी ते उपलब्ध करून देणे, यामुळे नगरसेवकांच्या अधिकारांवर अतिक्रमण होत असल्याची चर्चा ठाण्यात होत आहे.
संसद आणि विधिमंडळाच्या सदस्यांप्रमाणे नगरसेवकांना विशेषाधिकार नसले, तरी पोलिसांनी असे इतिवृत्त मागितल्याने व पाळत ठेवण्यासारखे प्रकार झाल्यास भविष्यात कुठल्याही विषयावर बोलताना नगरसेवकांच्या मनात भीतीचे सावट राहील, अशी भीती ते बोलून दाखवत आहेत. त्यामुळेच आता स्थायी समिती आणि महासभेत नगरसेवकांनी बोलायचे की नाही, असा सवाल ते करीत आहेत. विधानसभेत सदस्य एखाद्या कंत्राटदार, पोलीस अधिकारी अथवा बिल्डर उद्योजक यांचे प्रकरण लोकशाही आयुधांच्या माध्यमाने उपस्थित करून कारवाईची मागणी करतात. भविष्यात अशा व्यक्तीने आत्महत्या केली, तर नगरसेवकांचा न्याय आमदारांनाही लागू केला जाईल, अशी भीती नगरसेवक व्यक्त करीत आहेत.
ठाणे महापालिकेतील महासभा व स्थायी समितीच्या इतिवृत्ताची मागणी पोलिसांनी केल्यावर, महापालिका आयुक्तांनी नगरसेवकांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याकरिता त्यास सपशेल नकार द्यायला हवा होता, असे नगरसेवकांचे मत असल्याचे समजते. याबाबत महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता, पोलिसांच्या चौकशीचा तो भाग असून, ते कुणाचीही चौकशी करू शकतात. पोलिसांनी पालिका अधिकाऱ्यांकडील दस्तावेजांचीही तपासणी सुरू केली आहे. त्यांना सहकार्य करणे हे पालिकेचे काम आहे, असे ते म्हणाले.